You are currently viewing इन्सुली वेत्ये परिसरातील काळ्या दगडाच्या खाणीत वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांच्या प्रादुर्भावामुळे शाळेतील मुलांना झाल्या उलट्या

इन्सुली वेत्ये परिसरातील काळ्या दगडाच्या खाणीत वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांच्या प्रादुर्भावामुळे शाळेतील मुलांना झाल्या उलट्या

लहान मुलांच्या जीविताशी का होतोय खेळ…?

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली, वेत्ये, सोनुर्ली गावांच्या हद्दीमध्ये काळ्या दगडांच्या खाणी गेली काही वर्षे सुरू आहेत यापूर्वी अनेक वेळा या खाणीतून मोठ्या प्रमाणावर काळा दगड उत्खनन होऊन खाणींची खोली प्रमाणापेक्षा जास्त झाल्याच्या त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्याकडे मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या होत्या. परंतु खाण विभागाशी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची त्याचप्रमाणे आरटीओ अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याने या धनाढ्य व्यावसायिकाच्या खाण उद्योगावर कोणताही परिणाम झाला नाही की उपरोक्त अधिकाऱ्यांकडून ओव्हरलोड वाहतूक किंवा बेकायदेशीर उत्खनन याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही उलट विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे.
आपण काहीही केले तरी अधिकारी आपल्यावर कारवाई करणार नाही याची खात्री असल्यामुळेच हे खाण व्यवसायिक मुजोर झालेत आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर स्फोट घडवून दगडाचे उत्खनन सुरू झाले. त्यामुळे या तिन्ही गावातील अनेक घरांना तडे गेले, खाणीतील उडणारी दगडांची धूळ शेती बागायती मध्ये पसरल्यामुळे अनेक ठिकाणी शेतीची जमीन नापीक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील अतोनात नुकसान होत आहे. परंतु या सर्वांवर कहर केला तो म्हणजे काल या दगडांच्या खाणींमध्ये स्फोटासाठी वापरलेल्या स्फोटकांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने इन्सुली येथील शाळेतील मुलांना उलट्या होण्याचा प्रकार घडला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे इन्सुली गावामध्ये खळबळ उडाली. शाळेतील लहान मुलांना स्फोटकाच्या प्रादुर्भावाने उलट्या झाल्यामुळे लहान मुलांच्या जीविताशी हे खाण व्यवसायिक का खेळ करतायेत? अशा प्रकारचे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत.
आज पर्यंत या तिन्ही गावातील स्थानिक लोकांनी अन्याय सहन केला आहे, परंतु आता तर या खाणींमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांचा प्रादुर्भाव होऊन लहान मुलांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार घडल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. घडलेल्या प्रकाराची खबर शाळेच्या शिक्षिकेने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजय कोठावळे यांच्या कानावर घातली. याबाबत अजय कोठावळे यांनी सभेमध्ये हा विषय घेऊन मा.तहसीलदार सावंतवाडी यांजकडे निवेदनाद्वारे सदरची खाण कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. अशा प्रकारची मागणी करणार असल्याचे सांगितले. एकंदरीत इन्सुली येथे लहान मुलांच्या जीविताशी खेळण्याचा घडलेला प्रकार अत्यंत गंभीर प्रकार असून संबंधित यंत्रणेने याची त्वरित दखल घ्यावी आणि सदरच्या दगडाच्या खाणींवर योग्य ती कार्यवाही करावी. अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा