धूर्त दीपक केसरकर यांचे पुतणा मावशीचे प्रेम…
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचे टीकास्त्र…
नारायण राणेंच्या दहशतवादाचा मुद्दा उचलून धरत नाम.दीपक केसरकर यांनी आपली राजकीय कारकीर्द घडविली. सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष असलेले दीपक केसरकर हे आमदारकीचे स्वप्न पाहत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी मध्ये कार्यरत होते. नारायण राणे यांच्या शिष्टाई नंतर सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर यांना शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी दिली होती.
दीपक केसरकर यांनी आमदार झाल्यानंतर नारायण राणे यांच्या जिल्ह्यातील दहशतवादाचा मुद्दा उचलून धरत नारायण राणे यांना शह दिला. दरम्यान राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आघाडी धर्माचे पालन करून नारायण राणे यांचा प्रचार करण्यास केसरकरांना सांगितले असता केसरकरांनी नकार देत शरद पवार यांच्या सोबत झालेल्या मतभेदानंतर राष्ट्रवादीचा त्याग करून शरद पवार म्हणजे आपले राजकारणातील गुरू म्हणणाऱ्या शरद पवारांना दगा देत शिवसेना पक्षात प्रवेश करून आमदार, मंत्री, पालकमंत्री देखील झाले.
राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना पक्षाला अपेक्षित काम न केल्याने पुढील विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट्रिक करून देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी सरकारमध्ये पवारांमुळे केसरकरांना मंत्रिपद मिळाले नाही. मंत्रिपद न मिळाल्याने केसरकरांनी ठाकरें विरुद्ध कूटनीती करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना पक्ष सोडून बाहेर पडलेल्या ४० आमदारांसोबत जात शिंदे यांच्या गटाचे प्रथम प्रवक्ते व नंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. शिंदे सरकारमध्ये स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी ज्या नारायण राणे यांच्यावर दहशतवादाचा आरोप लावून त्यांची राजकीय कारकीर्द नेस्तनाबूत करण्याच्या वल्गना केल्या, त्याच नारायण राणे यांच्याशी जवळीक करण्यासाठी त्यांच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्याची तयारी दाखविणे म्हणजे हे धूर्त दीपक केसरकर यांचे पुतणा मावशीचे प्रेम आहे असे टीकास्त्र माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सोडले आहे.
प्रवीण भोसले एवढ्यावरच न थांबता, भाजपा पक्षातून भविष्यात राज्यसभेवर जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून केसरकर यांनी नारायण राणे यांच्या विरोधातील दहशतवादाचा मुद्दा गुंडाळून ठेवला असाही आरोप केला आहे. नारायण राणेंच्या विरोधात दंड थोपटून उभे असताना केसरकरांनी सावंतवाडीत संभवामी युगे युगे हा प्रतीकात्मक महानाट्य प्रयोग आणला होता. राक्षसाचा जीव पोपटात असतो, मोठा राक्षस, छोटे छोटे राक्षस असा उपरोधिक उल्लेख राणे यांना करणारे केसरकर राणेंच्या लोकसभेचा प्रचार करणार म्हणजे दाखविण्याचे आणि खाण्याचे दात केसरकरांनी दाखवून दिले आहेत. त्यामुळे केसरकरांचे नारायण राणे प्रेम हे पुतणा मावशी प्रेम असाही उपरोधिक टोला लगावला आहे.
एकेकाळी दीपक केसरकरांचे खास मित्र असणारे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केसरकरांवर सडकून टीका केल्याने राजकारणात महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी माणूस कोणत्या थरावर उतरतो, राजकारणात कोण कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो आणि राजकारणी जे बोलतात ते खरे करतात की उगाच फेकाफेकी करून केवळ आपला स्वार्थ साधतात याची प्रचिती “याची देहा याची डोळा” आली म्हणावयास काहीच हरकत नाही.