भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांचे तहसीलदार यांना निवेदन.
वैभववाडी प्रतिनिधी
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी तहसीलदार रामदास झळके यांना दिले आहे.
परतीच्या पावसामुळे तालुक्यात भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यातील कृषी विभाग, महसूल व ग्रामपंचायत विभाग संयुक्तरीत्या पंचनामे करीत आहेत. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात हे दुसरे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसामुळे भातशेती आडवी झाली आहे. काही भात अजूनही पाण्यात भिजत आहे. भात शेती ही तालुक्यातील शेतकऱ्यांची मुख्य शेती आहे. भातशेती जमीनदोस्त झाल्याने भविष्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे असे निवेदनात श्री काझी यांनी म्हटले आहे.