सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील होमगार्ड यांना विविध योजनांचा लाभ मिळण्याकरीता सिंधुदुर्ग जिल्हातील आस्थापनेवर असलेल्या 492 होमगार्ड जवानांचे खाते एच.डी.एफ.सी.बँकमध्ये काढण्यात आले आहे.त्यामुळे एच.डी.एफ.सी. बँकेच्या विविध योजनांचा लाभ होमगार्ड यांना मिळणार आहे. अशी माहिती होमगार्ड समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक नितिन बगाटे यांनी दिली.
गृह विभाग, राज्य शासनाकडे होमगार्डचा पगार हा एच.डी.एफ.सी. या बँकेत जमा केल्यास त्यांना विविध सुविधा आणि विमा योजनाचा लाभ मिळेल. होमगार्ड विभागाचे पोलीस महासंचालक, डॉ. उपाध्याय म्हणाले होमागार्ड जवानांना अपंगत्व आल्यास 25 लाख, मुत्यू आल्यास 50 लाख रुपये त्यांचे कुटुंबियाना विमा संरक्षण मिळणार आहे.
होमगार्ड विभागाचे पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या निर्णयामुळे सर्वसामान्य होमगार्ड जवानांच्या आयुष्यात मोठी आणि ऐतिहासिक घटना घडली. काही महिन्यापूर्वी ते सोलापूर आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, होमगार्डना जास्तीत जास्त सेवेची संधी मिळाली पाहीजे त्यांच्या पगार हा चांगल्या बँकेतून करण्याचा मानस आहे. जेणेकरून त्या बँकेकडून होमगार्ड जवानांना विमा संरक्षण मिळाले पाहीजे. कर्तव्य बजावत असतांना पोलीसांना जशा सोई सुविधा उपलब्ध होतात. त्याच धर्तीवर होमगार्डनाही सोई सुविधा मिळाल्या पाहीजे. होमगार्ड हा पोलीस म्हणुन काम करत असतो, त्यांनाही सुविधा मिळाल्या पाहिजेत असे सांगुन त्यांनी त्याप्रमाणे योजना तयार केली.
रायगड जिल्हयातील जखमी होमगार्ड जवान लक्ष्मण विठ्ठल आखाडे, यांचा मोठा अपघात झाला आणि त्यांचा एका पायाला गंभीर दुखापत झाली. तात्पुरती मदत होमगार्ड विभागाकडून त्यांना मिळाली परंतु डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या प्रयत्नामुळे एचडीएफसी बँकेत त्यांचे खाते असल्याने बँकेकडून जखमी होमगार्ड जवान आखाडे यांना 25 लाखाचा धनादेश मिळाला. हे होमगार्ड विभागाच्या इतिहासात प्रथमच घडले होते. होमगार्डना पगार व्यतिरिक्त कसलेच उत्पन्न नव्हते. परंतु विमा संरक्षण असल्याने जखमी झालेल्या होमगार्ड आखाडे यांना मोठा आर्थिक फायदा झाला.