संविता आश्रमातील “त्या” कोरोनाबाधितांची संपूर्ण जबाबदारी शिवसेना घेणार : अरुण दुधवडकर

संविता आश्रमातील “त्या” कोरोनाबाधितांची संपूर्ण जबाबदारी शिवसेना घेणार : अरुण दुधवडकर

कणकवली

निराधारांचा आधार ठरलेल्या अणाव येथील संविता आश्रमात २९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्व जण कोरोनामुक्त होईपर्यंत त्यांची सगळी जबाबदारी शिवसेनेकडून घेतली जाणार आहे. कोरोना बाधितांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च, प्रवास, भोजन, औषधे आणि सकस आहार यांची व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडून केली जाणार आहे.
कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे बोलताना याबाबतची माहिती श्री.अरुण दुधवडकर यांनी दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, राजु शेट्ये, शैलेश भोगले, सचिन सावंत, कन्हया पारकर, अँड.हर्षद गावडे, शेखर राणे, स्वरुपा विखाळे, निलम सावंत, राजु राठोड, अनिल हळदिवे, राजु राणे आदी उपस्थित होते

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही सन्माननीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आहे. शिवसेनेने आजवरच्या वाटचालीत याच तत्वावर मार्गक्रमण केले आहे. विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे आणि पर्यटन आणि पर्यावरण मंत्री मा.आदित्य ठाकरे यांचीही तीच शिकवण आहे. त्याच मार्गावर संघटना चालणार आहे.

अणाव येथे कार्यरत असलेल्या संविता आश्रमाने आपल्या कार्याने नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. निराधारांचा आधार बनलेली ही संस्था जिल्ह्याचा मानबिंदू आहे. मात्र येथे वास्तव्यास असणाऱ्या २९ जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या निराश्रितांना कुणीही वाली नाही, अशी सध्याची स्थिती आहे. नातेवाईकांनी अव्हेरलेल्या आणि एक एक दिवस कंठणाऱ्या या सर्वांवर कोरोनाचे संकट कोसळले आहे.

कोरोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णांना ओरोसला न्यावे लागते. तेथे शासकीय खर्चातून त्यांच्यावर उपचार केले जातात. मात्र काहीवेळा अधिक उपचारांची आवश्यकता भासते. ती सर्व व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडून केली जाणार आहे.

या संकटामुळे संस्थेने घाबरून जाऊ नये. शिवसेना संस्थेच्या आणि सर्व कोरोनाबाधितांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, कोरोनादरम्यान आणि कोरोनमुक्त झाल्यानंतर आवश्यक असणारा सकस आहार आणि औषधे यांची पूर्तता शिवसेनेकडून केली जाईल, असा विश्वास अरुण दुधवडकर यांनी यावेळी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा