You are currently viewing सिन्नर – शिर्डी महामार्गावर भीषण अपघात, खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक; 10 जणांचा मृत्यू

सिन्नर – शिर्डी महामार्गावर भीषण अपघात, खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक; 10 जणांचा मृत्यू

सिन्नर – शिर्डी महामार्गावर भीषण अपघात, खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक; 10 जणांचा मृत्यू

 

जिल्ह्यातील सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात  झाल्याची घटना आज सकाळी घडली. या भीषण अपघातात जवळपास 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे सिन्नरच्या रुग्णालयात पोहचले असून जखमी प्रवाशांची विचारपूस केली आहे. त्याचबरोबर या अपघातातील सात मृत प्रवाशांची ओळख पटली असून यामध्ये दीक्षा गोंधळी, प्रतीक्षा गोंधळी, श्रावण भारस्कर, श्रद्धा भारस्कर, नरेश उबाळे, वैशाली नरेश उबाळे, बालाजी कृष्णा मोहंती (ड्रायव्हर) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत.

मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खासगी बस आणि शिर्डीकडून सिन्नरबाजूकडे जाणारा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, बसची एक बाजू पूर्णतः चक्काचूर झालेली पाहायला मिळत आहे. यामध्ये जवळपास 45 प्रवाशी या बसमध्ये प्रवास करत होते. दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांवर सिन्नर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील सात मृत प्रवाशांची ओळख पटली असून अद्याप तीन मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. ते सर्व अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे समजते आहे. शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघाले होते, मात्र वाटेत भीषण संकटाला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे. तर दादा भुसे सिन्नरच्या रुग्णालयात पोहचले आहेत.

पाच लाखाची मदत

दरम्यान, अपघातानंतर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत, तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + two =