पुलाचे काम एप्रिल अखेर पूर्ण करणार ; माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांचा शब्द
मालवण
मालवण तालुक्यातील कर्ली नदीपत्रावर वराड सोनवडे दरम्यान उभारण्यात येत असलेले पुलाचे काम रखडले आहे. मात्र यापुढे कोणताही हलगर्जीपणा न करता योग्य पद्धतीने काम करत ३० एप्रिल पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना भाजपचे प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे यांनी संबंधित अधिकारी वर्गाला केल्या आहेत. त्यानुसार दर आठवड्याला झालेल्या कामाची माहिती देत एप्रिल अखेर काम पूर्ण केले जाईल. असे अधिकारी वर्गाने सांगितले.
कालावधीत काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याबाबत कार्यवाही करा. दोन्ही गावातील जनतेचे स्वप्न असलेले हे पूल लवकर पूर्ण झाले पाहिजे. असे निलेश राणे यांनी अधिकारी वर्गाला सांगितले.निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पुलाचे रखडलेले काम गेल्या काही दिवसांपासून गतिमान सुरू आहे. राणेंचा शब्द म्हणजे काम पूर्ण होणारच. यापूर्वीही अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे रखडलेल्या पूल प्रश्नी येत्या २६ जानेवारीला नदीपात्रात जाहीर केलेले उपोषण ग्रामस्थांनी मागे घेत असल्याची घोषणा गुरुवारी सायंकाळी केली.पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी राणे यांनी दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत अधिकारी वर्गाची बैठक गुरुवारी दुपारी वराड येथे घेतली. त्यावेळी काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना राणे यांनी केल्या आहेत.
पुलाच्या रखडलेल्या कामा संदर्भात वराड सोनवडे गावातील ग्रामस्थांनी २६ जानेवारीला उपोषणाचा इशारा दिल्या नंतर भाजप नेते निलेश राणे यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी ठेकेदारासमवेत आढावा बैठक घेत ठेकेदाराला काम पूर्ण करण्यासाठी एप्रिल अखेर पर्यंतची डेडलाईन दिली होती. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी गुरुवारी दुपारी पुला ठिकाणी अभियंता श्री. माळगांवकर, मक्तेदार व इतर जबाबदार प्रतिनिधींना बोलावुन ग्रामस्थांना अपेक्षित भुमिका मांडली.
वराड सोनवडे नदी पुल पुर्ण करण्यासाठीची अंतिम तारीख सर्वांसमक्ष विचारून घेतली. पुला संदर्भातील सर्व कामे ३० एप्रिल २०२३ पर्यंत पुर्ण करण्याची कबुली मक्तेदारी आणि अभियंता यांनी दिली. सदर कामासाठी आवश्यक प्रमाणात निधी आहे, असेही यावेळी अभियंता यांनी सांगितले.यावेळी जि. प. सदस्य संतोष साटविलकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, वराड सरपंच, सोनवडे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.