वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर सांगुळवाडी येथे संपन्न झाले.
दिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी,२०२४ या कालावधीत संपन्न झाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत “युवकांचा ध्यास ग्राम – शहर विकास” या थीमवर आधारित विविध व्याख्याने आयोजित करण्यात आली. जलसंवर्धन, समाज विकासातील युवकांचे योगदान, परसबागेतील भाज्या, मतदार जनजागृती, व्यसनमुक्ती, महिला व सायबर सुरक्षा, संविधान आणि महिला विषयी कायदे, रक्तदान श्रेष्ठदान इत्यादी विषयावर तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. शिबिर कालावधीत गावातील सार्वजनिक परिसराची स्वच्छता, बंधारे बांधणे, मतदार जनजागृती, प्रभात फेरी, विविध सामाजिक विषयावर पथनाट्य सादरीकरण, मंदिरे व रस्ते स्वच्छता, अंतर्गत रस्ते दुरुस्ती, इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभ महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विश्वनाथ रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. स्वयंसेवकांनी स्वतः सह राष्ट्रहितासाठी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री.यशवंतराव रावराणे यांनी स्वयंसेवकांना व्यवसायभिमुख होण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जनकाका रावराणे यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास करण्यासाठी स्वयंसेवकांनी प्रयत्नशील राहावे असे सांगितले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी. एस.काकडे यांनी काळाची गरज ओळखून विविध कौशल्य आत्मसात करावेत असे आवाहन केले.
सदर शिबिर कालावधीमध्ये स्वयंसेवकांच्या उत्कृष्ट सहभागाबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यामध्ये अवधूत डफळे (उत्कृष्ट स्वयंसेवक), सानिका पांचाळ (उत्कृष्ट स्वयंसेविका), महेश पाटणे व स्मिता मोरे (उत्कृष्ट गट), वैभवी बाणे व तेजस प्रभू (उत्कृष्ट पथनाट्य), सन्मान कदम (उत्कृष्ट गटप्रमुख), प्रणिता कोंडके (उत्कृष्ट गटप्रमुख) यांचा समावेश होता. सदरचे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. चौगुले, डॉ.एस.सी.राडे प्रा.आर.ए.भोसले व महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय रावराणे, वरिष्ठ लिपिक श्री बालाजी रावराणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या समारोप प्रसंगी व्यासपीठावर सांगुळवाडी गावचे सरपंच गौरी रावराणे, मुख्याध्यापिका स्नेहलता राणे, सांगुळवाडी ग्रामपंचायतचे सदस्य श्री.बालाजी रावराणे,ग्रामपंचायत सदस्य श्री. सत्यवान सुतार, गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री.प्रताप रावराणे, अंगणवाडी सेविका श्रीमती अंकिता भोवड , राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एम. ए .चौगुले, विभाग सदस्या प्रा.एस.एस. पाटील व प्रा.पी.एम. मांजरेकर
उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर.ए.भोसले, प्रस्तावना प्रा.डॉ.एम.ए.चौगुले व आभार डॉ.एस.सी.राडे यांनी मानले.