You are currently viewing स्वच्छतेच्या देशातील पुढच्या मानांकना करीता जि. प. ने कंबर कसली

स्वच्छतेच्या देशातील पुढच्या मानांकना करीता जि. प. ने कंबर कसली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शौचालयांच्या सेप्टिक टॅंक चे सर्वे सुरू

“ओडिएफ प्लस, प्लस” मानांकना करिता जि. प. चे काम सुरू

कणकवली

स्वच्छ भारत अभियानामध्ये देशात सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर या स्वच्छतेच्या देश पातळीवरील मानांकनांमधील पुढील टप्पा “ओडिएफ प्लस, प्लस” च्या मानांकनासाठी आता सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सज्ज होऊ लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये ग्रामसेवकांच्या, व मानधन तत्वांवर मोहिमेत सहभागी करून घेतलेल्या व्यक्ती मार्फत सर्वे सुरू करण्यात आला आहे. देशात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद स्वच्छतेत पहिल्या स्थानी आल्यानंतर आता त्या पुढील टप्पा म्हणजे शौचालया करिता सेप्टिक टॅंक असल्याबाबतचा घरोघरीचा सर्वे ग्रामसेवकांमार्फत सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. या सर्वे मध्ये ग्रामसेवकांनी प्रत्येक घराच्या शौचालयाच्या सेप्टिक टॅंक जवळ जाऊन शौचालयांच्या सेप्टिक टॅंक चे फोटो नोट कॅम अँप द्वारे अपलोड करायचे आहेत. जेणेकरून हा सर्वे कार्यालयामध्ये बसून न होता प्रत्यक्ष ग्रामसेवकांनी, किंवा मोहिमेत सहभागी करून घेतलेल्या व्यक्तींनी घटनास्थळी जात वस्तुस्थितीदर्शक सर्वे होण्याच्या दृष्टीने अक्षांश रेखांश सह हा फोटो संकलित करायचा आहे. देशपातळीवर पुन्हा एकदा स्वच्छतेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा डंका होण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून आता पावले उचलली जाऊ लागली आहेत. तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या अनुषंगाने देखील तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील सर्वच गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत. सांडपाणी व घनकचरा अंतर्गत प्लास्टिक संकलन शेड व कंपोस्ट खताच्या खड्ड्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. या कामांचे अनुदान देखील ग्रामपंचायतच्या स्वच्छ भारत मिशन च्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने देखील कार्यवाही सुरू करण्यात आली असून, ही कामे तात्काळ पूर्ण करून त्याचे फोटो ॲप द्वारे अपलोड करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. सेप्टिक टॅंक तसेच शौचालयाचे बांधकाम केलेल्या कुटुंबांच्या शौचालयांच्या टाकीचा फोटो व आधार कार्ड क्रमांक केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ओडिएफ प्लस, प्लस” च्या मानांकन रँकिंग मध्ये येण्याकरिता प्रशासन सज्ज झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्याकडून या अनुषंगाने नियमित आढावा देखील घेतला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात 97 महसुली गावे असून ऑनलाइन केलेल्या डाटा नुसार 24 हजार 674 कुटुंबे आहेत तर 21 हजार 618 सेप्टिक टॅंक आहेत, दोडामार्ग मध्ये 57 महसुली गावे असून यामध्ये ऑनलाइन डाटा नुसार 10 हजार 773 कुटुंबे आहेत व 10 हजार 636 सेप्टिक टॅंक आहेत. कणकवली तालुक्यात 106 महसुली गावे तर 28 हजार 745 कुटुंबे व 28 हजार 720 सेप्टिक टॅंक. कुडाळ तालुक्यात 122 महसुली गावे तर 32 हजार 720 कुटुंबे व 32 हजार 240 सेप्टिक टॅंक. मालवण तालुक्यात 135 महसुली गावे 26 हजार 934 कुटुंबे तर 26 हजार 842 सेप्टिक टॅंक, सावंतवाडी तालुक्यात 84 महसुली गावे तर 32 हजार 504 कुटुंबे आणि 31 हजार 233 सेप्टिक टॅंक, वैभववाडी तालुक्यात 58 महसुली गावे 11 हजार 850 कुटुंबे आणि 9 हजार 413 सेप्टिक टॅंक, वेंगुर्ले तालुक्यात 83 महसुली गाव तर 18 हजार 268 कुटुंबे व 16 हजार 916 असे सेप्टिक टॅंक चे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या सर्वेतील कुटुंबांची संख्या ही ऑनलाईन आकडेवारीनुसार घेण्यात आली असून त्यानुसार हे सर्वे तातडीने करण्याचे आदेश दिले गेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 742 महसुली गावांमधून 1 लाख 86 हजार 468 या ऑनलाइन केलेल्या कुटुंबाच्या आकडेवारीनुसार 1 लाख 77 हजार 618 सेप्टिक टॅंक चा सर्वे हाती घेण्यात आला आहे. या मानांकनात देशात सिंधुदुर्ग जिल्ह्याने जर बाजी मारली तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वच्छतेत पहिल्या क्रमांकासोबतच ओडिएफ प्लस, प्लस हे मानांकन देखील मिळवता येणार आहे. व हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मोठा तुरा रोवला जाणार आहे. याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे प्रशासन प्रयत्नशील असून, त्या दृष्टीने जोरदार पावले उचलली जाऊ लागली आहेत. तसेच ऑफिसमध्ये बसून सर्वे करण्याच्या पद्धतीला चाप लावत असतानाच नोट कॅम्प ॲप द्वारे अक्षांश – रेखांश घेत वस्तुस्थितीदर्शक सर्वे केला जात असल्याने यातून आता परिपूर्ण व वस्तुस्थितीदर्शक माहिती समोर येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − nine =