You are currently viewing चुकतंय कुठं

चुकतंय कुठं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*विषय – चुकतंय कुठं*
( *माझे मत* )

 

विस्मृती हे वरदान मानले जाते. फरगीव्ह अँड फरगेट असेही सांगितले जाते. पण मग विचार येतो काय विसरायचे? आणि कुणाला क्षमा करायची?

जेव्हा निर्भया, श्रद्धा, संपदा, गीता या आणि अशा अनेक- यांच्या बाबतीत समाजात जे घडतं, ते वाचून, ऐकून, पाहून मन सुन्न होतं. बधीर होतं. हे सहजासहजी विसरायचं? अपराध्याला क्षमा करायची?

एक मात्र खरं आहे की, मीडियाच्या सुळसुळाटामुळे अशा अंगावर काटे उभे करणाऱ्या घटना आपल्यापुढे येऊन आदळतात तेव्हां त्यावर चर्चा होतात, मोर्चे निघतात, आंदोलने होतात, जनक्षोभ अनुभवायला मिळतो. मेणबत्त्या जळतात. क्वचित कायदेही कठोर होतात. सरकारी यंत्रणा कंबर कसून गुन्हेगाराचा शोध घेतात. संभाव्य गुन्हेगारांची धरपकड होते. फोटो छापले जातात, ओळख परेडी होतात, गुन्हे दाखल होतात, न्यायालयात खटले चालतात, आणि या सगळ्यात लांबलचक काळही वाया जातो. तोपर्यंत समाज सारे विसरून गेलेला असतो आणि दुसरी अशी घटना घडेपर्यंत हे सारे चक्र असेच चालू राहते.

 

इथेच सारं चुकतं.
न्यायालयीन यंत्रणा इतकी सुस्त आहे की पीडिताला न्याय मिळेपर्यंत सारं थंडावून जातं. उरतो तो फक्त दबलेला आक्रोश!!

पण मुळातच या घटना का घडतात? याचे मूळ कारण समाजाला का शोधावसं वाटत नाही? जिहाद, बलात्कार,हुंडाबळी,एकतर्फी प्रेमातून होणार्‍या हिंसा, जातीयवाद, धर्मवाद यासारख्या माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना का घडतात?

अशा घटनांमध्ये दोन पक्ष असतात. एक आरोपी आणि दुसरा पीडित.आरोपीचा तिरस्कार आणि पिडीते विषयी करुणा हे स्वाभाविक आहे. आरोपी बलवान आणि पिडीत बेसावध किंवा अबला. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जाणवतो तो समाजाचा षंढपणा. शिथीलाता. कोडगेपणा.संवेदनहीनता. परदुःख हे शितल असतं. जोपर्यंत वादळ आपल्या घरात येत नाही तोपर्यंत तोडा, फोडा, जाळा ही तंत्रं म्हणजे केवळ मगरीचेच अश्रू.

समाज धुतल्या तांदळासारखा कधीच नसतो. पण तो सुधारावा म्हणून सकारात्मक प्रयत्न हे बदलत्या काळानुसार व्हायलाच हवेत.काळ मागे जाणार नाही.पण प्रश्न उरणारच.आणि ते विचारले पाहिजेत.
आजकालच हे का वाढले?
याला जबाबदार नक्की कोण?
बदलती जीवनपद्धती?
लहानपणीच होणारी सोशल मीडियाशी ओळख?
नको ते पाहण्याची लागलेली चटक?
त्यातून निर्माण होणारी लालसा, हवस, भोगवाद, विकृती आणि त्यात पार होरपळून गेलेली संस्कृती आणि मानवता?

सत्य एकच का?
नर आणि मादी.
इतक्या रानटी थरावर जेव्हा समाज जातो तेव्हा चुकतं कुठे याचा विचार करताना पुरुष आणि स्त्रीने आपापल्या नैतिकता तपासून पाहायला हव्यात. वाहवत जाणं ही जी मानसिकता आहे तिला कुठेतरी आवर घालायला हवा. लक्ष्मण रेषा ही फक्त स्त्रीनेच पाळायची संकल्पना नसून पुरुषांसाठीही की तितकीच बंधनकारक असायला हवी. समाज सुदृढ करण्याची जबाबदारी दोघांचीही आहे. प्रतिकार करण्याची सक्षमता स्त्रीने प्रयत्नपूर्वक मिळवणं आणि त्याचबरोबर मृगजळासारख्या सौख्याची भूल न पडू देण्याइतकी सावधानता बाळगणं ही काळाची गरज आहे.
पुरुषार्थ हा केवळ लैंगिकतेत नसून रक्षकाच्या भूमिकेत आहे हा संस्कार खोलवर रुजला पाहिजे.

विकृती ही समाजाची भयाकृती आहे. म्हणून ती दोघांसाठी घातक आहे. त्यासाठी समाज एकसंध हवा. त्यासाठी कौटुंबिक सुरक्षितता, नात्यांची बंधने, दया, क्षमा शांती, प्रेम, करुणा,वात्सल्य,संयम, सुसंगत,सदाचार या घटकांची पुनर्बांधणी आवश्यक आहे.

कुठे चुकतं? याचं एकच उत्तर.
या सुंदर मूल्यांची बदलत्या बेभान,
धुंद जगाची झालेली फारकत…..

*राधिका भांडारकर पुणे*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − fifteen =