सातत्य ठेवून कलाकारांना व्यासपीठ देवू, युवराज लखमराजे भोसले…
सावंतवाडी
लोककला महोत्सवाच्या माध्यमातून सावंतवाडीच्या राजवाड्यात पुन्हा एकदा अनेकांनी हजेरी लावली. त्यामुळे सावंतवाडीचे राजघराणे आणि लोक यांची नाळ पुन्हा एकदा जुळली आहे. अशाच प्रकारचे महोत्सव पुन्हा आयोजित करून यात सातत्य राखले जाईल, असे अभिवचन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान सावंतवाडी महाविद्यालयात लोककला केंद्र व्हावे यासाठी आमचा यापुढे पाठपुरावा असणार आहे. त्यासाठी कलाकारांनी आवश्यक असलेला पाठिंबा देणे गरजेचे आहे,असे ही त्यांनी सांगितले. श्री पंचम खेमराज महाविदयालय आणि सावंतवाडी राजघराण्याच्या माध्यमातून गेले चार दिवस येथील राजवाड्यात आयोजित करण्यात आलेल्या लोककला महोत्सवाचा समारोप आज येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी युवराज्ञी श्रध्दाराणी भोसले, प्राचार्य दिलीप भारमल, अॅड. शाम सावंत, अॅड. पी. डी. देसाई, दिलीप गोडकर, देवीदास बोर्डे, भुजंगराव हिरामणी आदी उपस्थित होते. यावेळी या महोत्सवात उपस्थित राहून आपल्या कला सादर करणार्या सर्व कलाकरांचे श्री. सावंत यांनी आभार मानले. दरवर्षी अशा प्रकारचे महोत्सव राबवून यात सातत्य ठेवले जाईल, असे अभिवचन दिले.
यावेळी अन्य उपस्थितांनी शुभेच्छा देत अशा प्रकारचा महोत्सव सावंतवाडी राजघराण्याच्या माध्यमातून आयोजित करण्यात आल्यामुळे त्याचा फायदा कलाकारांना झाला आहे. सर्वसामान्य नागरिक आणि राजघराणे यांच्यात पुन्हा एकदा जवळीक निर्माण झाली आहे. या पुढेही राजघराण्याने हा पायंडा असाच सुरू ठेवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.