You are currently viewing कुडाळ तालुक्यातील काजू उत्पादकांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन

कुडाळ तालुक्यातील काजू उत्पादकांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन

कुडाळ :

महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील डॉ. विजयकुमार देसाई (कीटकशास्त्राचे शास्त्रज्ञ व हॉर्टसॅप प्रकल्प समन्वयक) व डॉ. गोपाळ गोळवणकर (संशोधन सहयोगी) यांनी महाराष्ट्र शासनाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी विभागाचे श्रीमती गायत्री तेली मंडळ कृषी अधिकारी (माणगाव), पर्यवेक्षक श्री. ए.टी. परब (कडावल), श्रीमती एस. एस. परब (कडावल 1) श्रीमती गीतांजली परब (माणगाव), कृषी सहाय्यक श्री साईनाथ तांबोळी, श्री. दीपक गावित, श्री धनंजय कदम, श्री प्रशांत कुडतरकर व कृषी मित्र श्री. सुनील पवार यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील कुंदे, पोखरण, हिर्लोक, गोठोस, व माणगाव या कार्यक्षेत्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदर गावांमध्ये हॉर्टसॅप योजनेअंतर्गत एकूण 36 काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत काजूचे एकूण 15 भागांची सर्वेक्षण करण्यात आले.

निवडलेल्या गावातील काजूच्या बागांच्या पाहणीदरम्यान बऱ्याच बागा या पालवी व मोहरलेल्या अवस्थेत व स्वच्छ असल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या भागांमध्ये टी मॉस्किटो बग (ढेकण्या) व फुलकीडी यांचे प्रमाण नगण्य असल्याचे निदर्शनास आले. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यांचे बागेत योग्यवेळी फवारणी केल्याचे निदर्शनास आले. या सर्वेक्षण व मार्गदर्शन मोहिमेत काजू बागांची पाहणी करून शास्त्रज्ञांनी कृषी विभागाचे अधिकारी वर्गाच्या कीड व रोग सर्वेक्षण व मार्गदर्शनादरम्यान येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय योजना तसेच कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापनासाठी सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे प्रश्नांची निरसन केले. या भेटी दरम्यान कृषी विभागाच्या अधिकारी वर्ग व शेतकऱ्यांना काजू पीक संरक्षणासाठी लघु मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. सदर मोहीम ही प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला सहयोगी संशोधक संचालक डॉ. राजन खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा