You are currently viewing शासनाने राज्यात भव्य आयएएस केंद्र स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा….

शासनाने राज्यात भव्य आयएएस केंद्र स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा….

मिशन आयएएसची मागणी…

महाराष्ट्र सरकारने स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत स्पर्धा परीक्षा भवन उभारावे आणि आय ए एस या स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय करून द्यावी ही आज काळाची गरज आहे. बिहार, उत्तर प्रदेश मधील विद्यार्थी प्रचंड संख्येने प्रशासकीय सेवेमध्ये येत आहेत. त्या त्या सरकारने तशा प्रकारच्या सोयी त्या भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे गुजरातमध्ये प्रत्येकी दोनशे कोटी रुपयांची पाच स्पर्धा परीक्षा केंद्रे म्हणजे एक हजार कोटी रुपयांची तयार होत आहेत. यापैकी अहमदाबाद येथे सरदारधाम हे स्पर्धा परीक्षा केंद्र तयार झाले असून त्याचे उद्घाटन दोन वर्षांपूर्वी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले .या केंद्रामध्ये दोन हजार विद्यार्थ्यांची राहण्याची जेवणाची अभ्यासाची प्रशिक्षणाची व १८ प्रकारच्या यूपीएससी, बँकिंग, रेल्वे,स्टाफ सिलेक्शन एनडीए.JEE, NEET या शिक्षणाची व प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे .सर्वात महत्त्वाचे हे तयार झालेले सेंटर १३ मजली आहे .मी स्वतः या केंद्राला दोन वेळा भेट देऊन आलेलो आहे. येथे मुलींसाठी कुठल्याही प्रकारची फी नाही. राहणे जेवणे आणि प्रशिक्षण हे पूर्ण विनामूल्य आहे .गरीब मुलांसाठी वर्षाला दहा हजार तर श्रीमंत मुलांसाठी वीस हजार वार्षिक फी आहे. इतक्या अल्प दरामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणारी सरदारधाम ही भारतातील एकमेव संस्था आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही वास्तू गुजरातच्या पाटीदार समाजाने निर्माण केलेली आहे. त्यासाठी त्यांनी शासनाकडून एक रुपयाही अनुदान घेतलेले नाही. राजस्थानमध्ये डोंगरपुर जिल्ह्यामध्ये सागवाडा या तालुक्याच्या ठिकाणी एक सुंदर आहे आयएएस सेंटर तयार झालेले आहे . या विद्यानगर संस्थेचा परिसर सत्तर एकराचा आहे. या संस्थेमध्ये जवळपास ५४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेच्या स्वतःच्या ६५ स्कूल बसेस आहेत .या संस्थेने पदवी शिक्षणाबरोबर आय.ए.एस.चे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला आहे.इतके मोठे प्रशस्त सेंटर भारतात कुठेही नाही. आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी तन मनधनाने हे सेंटर विकास करण्याच्या मार्गावर आहेत. येथे शिकवायला येणाऱ्या प्रशिक्षकाला विमानाचे जाण्या येण्याचे भाडे देण्यात येते. शिवाय चांगले मानधन देण्यात येते. इतके मानधन महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही आयएएस प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येत नाही. संस्थेची इमारत प्रचंड मोठी असून सर्व प्रकारच्या सुविधा स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत .सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विद्यानगर संस्थेमध्ये एक हजार मुलांची राहण्याची जेवणाची व्यवस्था आहे. संस्थेचा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर असून पाहण्यासारखा आहे .ही संस्था पहायला येणाऱ्या लोकांची राहण्याची जेवणाची व पार्किंग व्यवस्था संस्थेतर्फे विनामूल्य करण्यात येते .


स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. आज सध्या महाराष्ट्र शासनाची जी स्पर्धा परीक्षा केंद्र आहेत ती गुजरात आणि राजस्थानच्या तुलनेत नगण्य आहेत .200 कोटीची इमारत कुठे आणि आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र शासनाचे कुठलेही स्पर्धा परीक्षा केंद्र घ्या ते याची बरोबरी करू शकत नाही. अमरावतीला स्पर्धा परीक्षा केंद्र तयार होत आहे .त्याचे बजेट वीस बावीस कोटी रुपयांचे आहे. मुंबईला एस आय एस सी हे शासकीय स्पर्धा परीक्षा केंद्र आहे .पण त्याची अवस्था कशी आहे ते न बोललेले बरे. फरक एवढाच आहे की महाराष्ट्रातील या केंद्रामध्ये जी मुलं एकत्र येतात ती स्वतःच्या बळावर आयएएस होतात. या केंद्रांचा फायदा होतो तो अभ्यासिकेचा आणि ग्रंथालयाचा. परवा मी पुण्याला एका आरआयआयएम या संस्थेला ला भेट दिली .रामचंद्र इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बावधन पुणे असा या संस्थेचा पत्ता आहे . कोट्यावधी रुपयांची ही वास्तू आहे .या वास्तूमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे येथे मुलांची राहण्याची जेवणाची व प्रशिक्षणाची विनामूल्य व्यवस्था करण्यात येणार आहे. ही एक खाजगी संस्था आहे .या संस्थेची इमारत कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेल पेक्षा कमी नाही .मी त्यांना विचारले की तुम्ही विनामूल्य व्यवस्था कशी काय करून देत आहात ? तर त्यावर त्यांनी उत्तर दिले की सर या महाराष्ट्रातून मुले बहुसंख्येने प्रशासनात गेली पाहिजेत असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते .शिवाय आमच्याकडे इतर सहाशे विद्यार्थी आहेत .ते आमच्याकडे बीबीए,एमबीए हे प्रशिक्षण घेत आहेत. आम्हाला प्रामाणिकपणे वाटते की आम्ही महाराष्ट्र राज्यांमध्ये जे विद्यार्थी प्रामाणिकपणे काम करतात त्या विद्यार्थ्यांच्या आयएएस होण्याच्या प्रयत्नात आम्ही हातभार लावला पाहिजे. एक पंचतारांकित दर्जाची संस्था विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा साठी विनामूल्य निवास व्यवस्था भोजन व्यवस्था व प्रशिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकते तर आपले महाराष्ट्र शासन तर फार मोठे आहे .मी २००८ मध्ये महाराष्ट्र शासनाकडे महाराष्ट्र शासनाने एक आयएएस केंद्र दिल्ली येथे काढावे असा एक प्रस्ताव दिला होता. आज या गोष्टीला पंधरा वर्षे पूर्ण झालेले आहेत. परंतु शासनाचा दिल्लीला तर सोडाच पण महाराष्ट्रातही चांगले आयएएस केंद्र तयार व्हावे असा संकल्प दिसत नाही आणि म्हणून आपण ठिकठिकाणी महाराष्ट्र भवन बांधत आहात. आपला निर्णय चांगलाच आहे. पण मराठी पाऊल पडते पुढे यासाठी आपण किमान महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आयएएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी एक चांगले महाराष्ट्र आयएएस स्पर्धा परीक्षा केंद्र तन मन धनाने आणि भरपूर पैसा ओतून तयार करावे अशीच महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा आहे.
==============
*प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे*
संचालक मिशन आयएएस अमरावती 9890967003*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा