You are currently viewing उंच माझा झोका

उंच माझा झोका

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*उंच माझा झोका*

सरस्वती आमच्या साक्षरता वर्गात रोज यायची.उंच,सडसडीत, अनवाणी,विस्कटलेले केस,ठिकठिकाणी जोड लावून शिवलेलं मळकट लुगडं.पण डोळ्यात विलक्षण चमक. काम करून करून घट्टे पडलेले हात पण ओंजळीत ओली स्वप्नं!!

तांबापुरा झोपडपट्टीत राहण्यार्‍या ,मोलमजुरी करणार्‍या महिलांना ,कित्येकवेळा आमच्या वर्गात येण्यासाठी,विनवण्या कराव्या लागायच्या . शिकाल तर वाचाल. हे जीव तोडून पटवून द्यावं लागायचं.

तांबापुरा ही वस्ती शहराच्या एका टोकाला होती. पार रेल्वे फाटकाच्या पलीकडे. संपूर्ण वस्तीवर दारिद्र्याचं सावट होतं. आम्ही जेव्हां जेव्हां त्या वस्तीत जायचो ,तेव्हां तेव्हां,मनात यायचं,कशी ही माणसं जगतात!! किती गलीच्छ यांचं जीवन! खरोखरच आयुष्य म्हणजे नुसता उकीरडा.

दाट ,एकमेकांना चिकटून बांधलेल्या, बांधलेल्या कसल्या? पत्रे, माती ,झाडांच्या फांद्या जमवून उभारलेल्या झोपड्या. .काहींना तर छप्परही नसे. उघडी, बोडकी घरे, वाहणारी विनाच्छादीत गटारे, डास मच्छर. सगळीच टंचाई..पाण्याची. विजेची.एखादं वाण्याचं दुकान,मळकट बरणीतील गोळ्या,बिस्कीटं, झाडाच्या सावलीत बसलेला चामड्याचाच रंग असलेला चांंभार, सायकलचं पंक्चर काढणारा आण्णा, एकमेकांना शिव्या
देउन भांडणारी माणसं, उघडी, नागडी शेंबडी मुलं…
कसलंच भविष्य ,ध्येय नसलेली. सगळ्यांपासून दुरावलेली. त्या वस्तीच्या अंतरंगात काय काय घडत असेल..नीती धर्माच्या पलीकडचे.

तिथून परत घरी आल्यानंतर,आणि स्वच्छ आंघोळ करुन,वातानुकुलीत खोलीत,गरमागरम चहाचे घुटके घेताना,मन खरवडल्यासारखं जाणवायचं. विशेषत:
तिथल्या स्रीजीवनाचं,एक भयाण चित्र ,मनाच्या पाटीवर
आकारायचं आणि आपसुक ,सावळी ,उंच रापलेली सरस्वती सतत डोळ्यासमोर यायची.

ती वेगळी होती.

आमच्या साक्षरता वर्गात या बायकांची न येण्याची कारणंही खूप होती. दारु पिण्यार्‍या नवर्‍याचा धाक,मारझोड वस्तीतल्याच लोकांकडून मिळणारे टोमणे,संशय.जीवन म्हणजे राबराब राबणं.त्यातून न मिळणारी ऊसंत. एक ना अनेक.
पण सरस्वती मात्र या सगळ्यांवर मात करून ,धावत पळत आमच्या साक्षरता वर्गात यायची. पाटीवर छान अक्षरं गिरवाय. धडे वाचायची.कविता म्हणायची.समजलं नाही तर प्रश्न विचारायची.

तिची जिद्द पाहून मीही थक्क व्हायचे.

लहान असतानाच एका बिजवराशी तिचं लग्न लावलं गेलं होतं. सुख म्हणजे काय असतं हे कधी कळलंच नाही.
ना माहेरी ना सासरी. जीवन म्हणजे नुसता चिखल.

एक दिवस ती मला म्हणाली ,”ताई मला यातून सुटायचंय्. मला माझ्या जगण्याचा अधिकार मिळवायचाय्. मला तर एक चांगलं आयुष्य जगायचच आहे आणि जमेल तेव्हढं माझ्यासारख्यांनाही मला बरोबर घेऊन चालायच्ंय्.

तिची स्वप्नं,तिची जिद्द मला स्पर्शून जायची. चिखलांत उगवणार्‍या कमलकळीसारखी ती मला भासायची. या पाकळ्या उलगडून एक तजेलदार पूर्ण उमलेलं फुल मला
दिसायचं.आणि वाटायचं,आमच्या साक्षरता ऊपक्रमातून,
एखादी तरी महिला ,खर्‍या अर्थाने सक्षम झाली तर ते नक्कीच सन्माननीय,आणि अभिमानास्पद असणार नव्हतं का?

आमच्या साक्षरता वर्गातून सरस्वतीच्या स्वप्नांना एक पायरी मिळाली मात्र..पण तिचा प्रवास खूप लांबचा होता खाचखळग्यांचा दगड गोट्यांचा होता.पण तिची पावलं घट्टं होती.
मधून मधून ती मला भेटायला यायची. प्रत्येक वेळी मला तिच्यातले बदल जाणवायचे. तिच्या स्वप्नांपासून ती जराही हटली नव्हती. ऊलट अधिकाधिक वाटा तिला मिळायला लागल्या होत्या.

एक दिवस ती मला म्हणाली,
“मी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उभी राहणार आहे.
वस्तीतल्या सर्व बायकांना मी एकत्र करणार आहे…”
मी काहीशी चकीत झालेही.
निवडणुक कशी लढणार ही? आरक्षणातून तिला उमेदवारी मिळू शकेल हे खरं. पण निवडणुक लढवणं?
हे कसं तिला जमेल? कुठलं भांडवल,मनुष्यबळ आहे
तिच्या मागे?
पण तिचा निर्धार विलक्षण होता.तिच्या मनाची ताकद मला जाणवली.तेच तिचं भांडवल होतं.
“ताई पावर पायजे..पावर असली ना की वाट मिळते…”
मला तिच्या बोलण्याचं क्षणभर हसुही आलं. पण मला तिचं मनोधैर्य खच्ची नव्हतं करायचं. तिने घेतलेला दमदार झोका अडवायचा नव्हता.

ग्राम पंचायतची निवडणुक तिने लढवली.
ती जिंकली. सरपंच झाली .महिला सरपंचाचा मान तिला मिळाला. तिने हे सरपंचपद नाकारावं म्हणून
तिला अनेक धमक्यांना सामोरं जावं लागलं. पण ती ढळली नाही.

वस्तीतल्याच काही गुंडांना हाताशी धरुन विरोधकांनी तिच्या नवर्‍याचे अपहरण केले. सरपंचपदाच्या शपथ दिनापर्यंत त्याला अज्ञात ठिकाणी लपवून ठेवले.आपल्या सौभाग्य रक्षणासाठी तरी ही हे पद सोडेल याची विरोधकांना खात्री होती.
पण सरस्वतीचं रसायन घट्ट होतं.तिची अंतर्शक्ती अचाट होती.
ती ढळली नाही.
तिला खूप ऐकूनही घ्यावं लागलं.
“असली कसली बाई ही! हिच्या नवर्‍याच्या जीवावर उठलय् तरी माघारी घेऊ नये का हिने?”
पण त्यावर तिचे उत्तर असे,
“पाहून घेईन एकेकाला मागाहून. कां मी भिऊ?”

आता सरस्वतीला एक वलय मिळालं.एक व्यासपीठ मिळालं.तिने कायदे समजून घेतले..समस्येला भिडण्याचे तंत्र जाणून घेतले. तिच्यातल्या स्त्रीशक्तीला ती फुंकत राहिली. स्वत:साठीही आणि इतर पीडीतांसाठीही.
तिने अत्याचारित महिलांसाठी अल्पबचत गट तयार केले. बँकांकडून सहाय्य मिळवलं. अनेकांच्या गुणांचं
संकलन करून या माध्यमातून तिने त्यांना सक्षम बनवण्याचा विडाच ऊचलला.अंगणवाडीतही तिचा महत्वपूर्ण सहभाग होता.
बघता बघता सरस्वतीच्या स्वप्नांचा आलेख उंच उंच
होत गेला. आता ती सरस्वती बाई झाली होती.ती एका गळीत समाजाची आधारभूत बनली होती.” माय”
माऊली संबोधली जाऊ लागली होती.

प्रश्न, समस्या,अडचणी अनंत होत्या..एकेका व्यक्तीच्या जीवनात अपरंपार,रक्तबंबाळ करणारे काटे होते.सरस्वती
त्यांचे काटे वेचू लागली.ती त्यांची मलमपट्टी झाली.
काया कृश असली तरी हात बळकट होते.तिच्यात होती अहिल्या.तिच्यात होती सावित्री. तिच्या हातातल्या तृणकाडीत सीतेची शक्ती होती.

आज टीव्हीवर स्त्रीगौरव पुरस्काराचा कार्यक्रम होता..
सरस्वतीचा सत्कार होणार होता.तिला मानचिह्नांने सन्मानीत केलं जाणार होतं.

मी टीव्ही लावला.उंच माझा झोका या कार्यक्रमात
आज बारा जणींचा सत्कार होणार होता.
एकेक मानांकीत पुढे येत होती.आपापल्या कार्याची यशस्वी कथा सांगत होती.स्क्रीनवर सरस्वती झळकली तेव्हां क्षणभर माझे डोळे पाणावले. उंच, सावळी, कृश,ताठ काया.अंगावर काठाचं सुती लुगडं. कपाळावर मोठ्ठं कुंकु.
त्या कुंकवाकडे पाहताना मला ते फक्त सौभाग्याचं प्रतीक नव्हतं वाटत. त्यातल्या कणाकणात स्त्रीशक्ती झिरपत होती.
पुरस्कार चिह्न हातात घेऊन आपलं मनोगत व्यक्त
करणार्‍या सरस्वतीच्या डोळ्यात आजही तीच चमक होती. मी ऐकत नव्हतेच एक उंच गेलेला झोका
पाहत होते फक्त.
पाहता पाहता डोळे भरले.सरस्वतीचं स्वप्न पूर्ण झालं.तिचा झोका उंच चालला होता.
या झोक्याला मी फक्त एक हलकासा धक्का दिला होता.

सौ.राधिका भांडारकर
पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा