You are currently viewing कणकवली शहरात स्त्रियांसाठी स्वच्छ, सुसज्ज व सुरक्षित स्वच्छतागृह उभारण्यात यावी

कणकवली शहरात स्त्रियांसाठी स्वच्छ, सुसज्ज व सुरक्षित स्वच्छतागृह उभारण्यात यावी

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अनुभव शिक्षा केंद्र, साद टीम आणि लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने तहसीलदार आणि नगराध्यक्षांकडे मागणी

कणकवली

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून अनुभव शिक्षा केंद्र, साद टीम कणकवली आणि लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या वतीने कणकवली शहरात स्त्रियांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात यावे, याविषयीचे निवेदन कणकवली तहसीलदार आर. जे. पवार आणि कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी भालचंद्र महाराज मठ आणि इतर एका ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाचे काम चालू करायला मंजुरी मिळाल्याचे सांगितले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जन्मभर यातना सोसून स्त्री शिक्षणाची लढाई सुरू ठेवली. त्यांच्या कार्यामुळे आज स्त्रीया वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. मात्र सार्वजनिक ठिकाणी अजूनही स्त्रियांना निरनिराळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यापैकीच एक समस्या म्हणजे स्वच्छतागृह उपलब्ध नसणे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अनुभव शिक्षा केंद्र, साद टीम, कणकवली आणि लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या मार्फत आज कणकवली तहसीलदार आर. जे. पवार आणि कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे शहरातील मुख्य ठिकाणी स्वच्छ, सुसज्ज व सुरक्षित स्वच्छतागृहांची तातडीने उभारणी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. तसेच आधीपासूनच असलेली स्वच्छतागृहे स्वच्छ आणि सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय वैदिक गणित प्रशिक्षक आणि कवयित्री रुपाली कदम, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, साद टीम संघटक श्रेयश शिंदे, विशाल गुरव, संविधान संवादक सुजय जाधव, अमित राऊळ आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =