आंगणे कुटुंबियांच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न
मुंबई :
आंगणेवाडीच्या पुण्यभूमीने विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणारी रत्ने निर्माण केली आहेत. चांगले शिक्षण घेतल्याने जीवनात उत्कर्ष होतो. या मंडळाने आंगणेवाडी मधील सर्वांना एकत्र करत आजचा हा देखणा व दिमाखदार कार्यक्रम आयोजित केला आहे. असेच कार्यक्रम उत्साहात साजरे करा. सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून मंडळाने नवीन प्रेरणा या मुलांना दिली आहे. या मुलांनी उच्च शिक्षित होताना नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे, असे प्रतिपादन उद्योजक डॉ. दीपक परब यांनी परेल (मुंबई) येथे बोलताना केले.
आंगणेवाडी विकास मंडळ मुंबई यांच्यावतीने वार्षिक विद्यार्थी गुणगौरव सोहळा व ग्रामस्थांचे स्नेहसंमेलन परेल मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. दीपक परब बोलत होते. यावेळी सिने नाट्य अभिनेते प्रमोद पवार, तसेच ७५ वर्ष पूर्ण केलेल्या जगदीश आंगणे, सुधाकर आंगणे, आत्माराम आंगणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष भास्कर आंगणे, प्रमुख कार्यवाह मधुकर आंगणे, आनंद आंगणे, बाळा आंगणे, बाब्या आंगणे, अनंत आंगणे, काका आंगणे तसेच आंगणे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या. यावेळी पहिली ते उच्च शिक्षण घेणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच टॉवर या शॉर्ट फिल्म कलाकारांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी आंगणेवाडी ग्रामस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रास्ताविक मधुकर आंगणे यांनी केले.