मालवण
देवगड तालुक्यातील तांबळडेग गावचा सुपुत्र कु.वेदांत बाबुराव सनये याची रत्नागिरी जि.प.मार्फत घेण्यात आलेल्या ‘ जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान ‘ या उपक्रमांतर्गत कुवारबाव शाळेतून नासा व इस्रोच्या भेट दौऱ्यासाठी निवड झाली आहे. अंतराळाचा अभ्यास करणाऱ्या इस्रो व नासा या संस्थांच्या भेटीसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून संशोधक, शात्रज्ञ निर्माण होण्यास प्रोत्साहन दिले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातून २७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. कु. वेदांत हा महालक्ष्मीनगर,कुवारबाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ७ वीत शिकत आहे. अमेरिकन दूतवासातून व्हिसा प्राप्त झाल्यावर हे विद्यार्थी नासासाठी प्रयाण करतील.
कु.वेदांत याच्या या यशाबद्दल तेथील शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, ग्रामपंचायत व पालकांनी कुवारबाव येथे वाजतगाजत त्याची मिरवणूक काढली होती. शाळेसाठी ही कामगिरी अभिमानास्पद असून तांबळडेग व कुवारबाव पंचक्रोशीतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी त्याला मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक, शिक्षक व त्याचे आई वडील यांचेही अभिनंदन करण्यात आले.