You are currently viewing मालवण पालिकेची अवस्था ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण’ – विजय केनवडेकर 

मालवण पालिकेची अवस्था ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण’ – विजय केनवडेकर 

खासगी जागेत कचरा टाकणाऱ्या पालिकेवर कोण कारवाई करणार…

मालवण

मालवण पालिकेच्या माध्यमातून कचरा उघड्यावर टाकणे, उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. स्वच्छ शहरासाठी अशी कारवाई करणे योग्यच आहे. पण लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी अवस्था पालिकेची झाली आहे. शहरातील गोळा केलेला कचरा सागरी महामार्ग येथे खासगी जागेत टाकला जात आहे व या कचऱ्याला सायंकाळची आग लावली जात आहे. हे नियमात आहे का? सागरी महामार्गावर पूर्णपणे दुर्गंधी पसरली असून लावलेल्या आगीमुळे धुराचा मोठ्या प्रमाणात विषारी प्रादुर्भाव या भागात होत असताना दिसत आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत पालिकेवर कोणी कारवाई करायची हे तरी प्रशासनाने स्पष्ट करावे असा प्रश्न भाजपचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी पत्रकाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

पालिकेत भाजपा सत्तेत होती तेव्हा पहिले काम मालवण शहर स्वच्छतेचे घेतले होते. त्यावेळचे आरोग्य सभापती परशुराम ऊर्फ आप्पा लुडबे यांनी दोन वर्षात शहर स्वच्छतेसाठी जातीनिशी लक्ष घालून पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा मालवण डम्पिंग ग्राउंड स्वच्छ केले होते. १५० डंपर कचरा डम्पिंग ग्राउंड मधून बाहेर काढला. तो कचरा खासगी जागेत परवानगी घेऊन टाकला होता. पण या कचऱ्यामुळे कोणतीही दुर्गंधी किंवा नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता प्रशासनाला घ्यायला लावली होती. प्रशासनाकडून आता अशी काळजी का घेतली जात नाही. डम्पिंग ग्राउंड मध्ये कचरा विघटन व्यवस्था कार्यान्वित केली होती ती पुढे का सक्षमपणे राबवली गेली नाही. दोन वर्षात पहिले होते तसेच डम्पिंग ग्राउंड पूर्ण कचऱ्याने भरले आहे. आजूबाजूच्या परिसरात पूर्णपणे दुर्गंधी पसरली असून भटकी जनावरे हा कचरा रस्त्यावर आणून घाण करत आहेत. सागरी महामार्गावर असेच कचऱ्याचे घाणीचे साम्राज्य असून सॅनिटरी पॅड, हगीज सारखी पॅड भटके कुत्रे नागरिकांच्या परिसरात टाकून घाण करत आहेत. ज्या डम्पिंग ग्राउंड मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी भेट देऊन कामाची प्रशंसा करून चहा पिऊन गेले होते. त्याच डम्पिंग ग्राउंड मध्ये आतमध्ये जाता ही येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहरातील शौच टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही. उपलब्ध जागा पूर्ण भरली असून घाण बाहेर येत आहे. खासगी जागेतच खड्डा मारून याचे विघटन केले जाते हे विघटन करणे बरोबर आहे का ? शहर स्वच्छतेसाठी घेतलेल्या नवीन कचरा गाड्या दोन वर्षातच नादुरुस्त कशा झाल्या की जाणून-बुजून ठेकेदाराच्या फायद्यासाठी नादुरुस्त केल्या गेल्या का ? लाखो रुपये खर्चून कचऱ्याचे विघटन विद्युत प्रकल्प बंद का? याबाबत प्रशासन चौकशी करणार की नाही. दोन वर्षात कचरा विघटनावर ४० ते ४५ लाख रुपये खर्च करूनही डम्पिंग ग्राउंड कचऱ्याने भरलेले कसे असे प्रश्न श्री. केनवडेकर यांनी उपस्थित केले आहेत.

पालिकेचे फक्त ऑनलाईन सर्वेक्षण ऑनलाइन तक्रार निवारण न करता प्रत्यक्ष नियोजन करणे आवश्यक आहे. वाढीव दराने दिलेले कचरा ठेका तरी ठेकेदार कामगारांचे पगाराचे पगार न देता ठेका का सोडतो. त्याच्यावर कारवाई का होत नाही याची पण उत्तर प्रशासनाने दिली पाहिजेत. मागील तीन वर्षात पालिका सत्तेपासून दूर असल्यापासून कारभार आरंभ शून्य एक कलमी कार्यक्रम राबवताना दिसत आहे. शहरात सुरू केलेल्या एकही प्रकल्प यशस्वीपणे पूर्णत्वास नेता आला नाही. शहरात सुरू केलेला विकास कामाचा निधी फक्त दोन-तीन वार्डात कार्यान्वित करून इतर जनतेला वेठीस धरण्याचे काम पालिका प्रशासनाने केले आहे. कचऱ्याबाबत व नियमाचे पालन करण्यासाठी आवश्यक ती कारवाई आपण जरूर करावी पण आपणही नियमात वागावे. शहराच्या विकासासाठी कायम मालवण पालिकेच्या प्रशासनाबरोबर आम्हीही शंभर टक्के उभे राहू असेही मालवण शहर प्रभारी श्री. केनवडेकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा