अंमल पदार्थांची तस्करी,वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती
सिंधुदुर्गनगरी
अंमल पदार्थांची होणारी तस्करी व अवैध वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करुन कारवाई करावी.अंमली पदार्थ लागवडीबाबत संबंधित विभागांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवावी. अंमली पदार्थ सेवन व विक्री करणाऱ्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को कोऑडीनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची एकत्रित बैठक आज झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक संदीप भोसले यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. तसेच विभाग निहाय आढावा घेतला. अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक उपाय-योजना अंमलबजावणीबाबत गृह विभाग व सर्व संबंधित विभागाव्दारे सुरु असलेल्या कामाची माहिती दिली.
उपजिल्हाधिकारी श्री. मठपती म्हणाले, अंमली पदार्थ तस्करी, वाहतूक व लागवडीस आळा घालण्यासाठी लोकसहभागाचीही आवश्यकता आहे. त्यासाठी जनतेनेही शासकीय यंत्रणेला मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्पपरिणामांची माहिती व्हावी, यासाठी शाळा- महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात यावी. नशाबंदी, व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आरोग्य विभागाने व्यसनामुळे होणाऱ्या आजाराबाबत कार्यक्रम घ्यावेत.व्याख्यान, कार्यशाळा त्याबरोबर प्रशिक्षण याचे आयोजन करावे. सर्व विभागांनी संयुक्तपणे अंमली पदार्थ लागवड, विक्री तसेच वाहतूक याविरोधात मोहीम राबवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीला राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक बी.एस. तडवी, अन्न औषध प्रशासनचे सहायक आयुक्त मिलींद पाटील, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ आदी उपस्थित होते.