स्त्री-शक्ती.

स्त्री-शक्ती.

सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील माजगाव येथील जिल्हापरिषद शाळा नं.१ मधून प्राथमिक व मिलाग्रीस हायस्कुल येथून माध्यमिक शिक्षण घेतलेल्या व सद्ध्या सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या सौ.अनामिका चव्हाण या सिंधुदुर्ग जिल्ह्यावासीयांसाठी एक आदर्श आहेत. आपल्याच जिल्ह्यातील एक स्त्री-शक्ती जिल्हापरिषदेत उच्च अधिकारी म्हणून कार्यरत असणे हे जिल्ह्यासाठी भूषणावह असते.
मिलाग्रीस हायस्कुल मध्ये शिकत असताना झालेल्या रस्ता अपघातात जायबंदी होऊनही अत्यंत कठीण प्रसंगातून सावरत संघर्ष करत त्यांनी संकटालाही हरवून यश संपादन केले. शासकीय तंत्रनिकेतन, मालवण येथे डिप्लोमा पूर्ण करून कोल्हापूर येथील डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,कोल्हापूर मधून त्यांनी इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. इंजिनिअरिंग झाल्यानंतर काही काळ शासकीय तंत्रनिकेतन, मालवण मध्ये लेक्चरर म्हणून नोकरी केली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून (MPSC) इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मधून त्यांचे सिलेक्शन झाले आणि त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) सेवेत दाखल झाल्या. मुंबई येथे डिझाइन विंग मध्ये जिथे सरकारी इमारती व पुलांची आरसीसी डिझाईनची कामे केली जातात तिथे तीन वर्षे काम केलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यक्ती कितीही मोठी झाली तरी तिला जिल्ह्याची ओढ ही असतेच. मुंबई येथून पुढे बदली होत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी १ वर्ग १ म्हणून रुजू झाल्या. आपला अनुभव सांगताना त्या म्हणतात की आपल्या जिल्ह्याची भौगोलिक स्थिती इतर जिल्ह्याच्या तुलनेत फारच वेगळी आहे, त्यामुळे येथील प्रत्येक कामाचं स्वरूप वेगळं असतं, तसंच प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. सावंतवाडी बांधकाम विभागात देखील त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे. स्वतःच्या शहरात काम करण्याचा आनंद देखील माणसाला एक वेगळं समाधान देऊन जातो. आणि तेच सुख त्यांनी जिल्ह्यात काम करताना अनुभवलंय. पुढे त्या सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत झाल्या. सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असतानाच सद्ध्या त्या कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा देखील अतिरिक्त भार सांभाळत आहेत.
सौ.अनामिका चव्हाण यांच्यामते प्रत्येक काम वेगळं असतं. सार्वजनिक बांधकाम विभागमध्ये काम करताना आणि जिल्हापरिषदेत काम करताना वेगळेपणा असतो. सार्वजनिक बांधकाम विभागात कामाचं स्वरूप मोठं असतं. परंतु जिल्हा परिषद मध्ये छोट्या कामांमधून अगदी गावागावातील छोट्या वाड्यांमध्ये काम करण्याची संधी मिळते. लोकप्रतिनिधी हे लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात आणि करवून घेत असतात, त्यामुळे दोघांच्याही सहकार्यानेच काम करावं लागतं. कारण अधिकारी म्हणून लोकांसाठी बनविलेल्या योजना प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोचवायच्या असतात. त्यामुळे अधिकारी म्हणजे लोकप्रतिनिधी आणि जनता यामधील दुवा असतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरील अधिकारी वर्ग येण्यास नाखूष असतात, आणि त्याला कारणेही तशीच आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिकरित्या संपन्न असला तरी सिंधुदुर्ग जिल्हा प्रगत नाही, जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या चांगल्या सुविधा नाहीत, हाही एक मुद्दा आहे आणि काही अधिकारी वर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त काम करावं लागतं म्हणूनही येण्यास तयार नसतात . परंतु आपल्याच जिल्ह्यात शिकून पुढे उच्च शिक्षण घेऊन पुन्हा जिल्ह्याच्या विकासात खारीचा वाटा उचलणाऱ्या अनामिका चव्हाण सारख्या अधिकाऱ्यांमुळे भविष्यात जिल्ह्याला नक्कीच सुगीचे दिवस येतील यात शंकाच नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकारी अभियंता म्हणून काम करत असताना भविष्यातील ध्येयाबद्दल अनामिका चव्हाण बोलताना म्हणाल्या की, आपला सिंधुदुर्ग जिल्हा सर्व सोयींनी युक्त असावा, मुख्य म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर…रस्ते जोडणी आणि मजबुतीकरण. जिल्ह्यांतर्गत रस्ते महामार्गानी जोडले गेल्यास जिल्ह्याच्या प्रगतीला, विकासाला वेग प्राप्त होतो. त्यामुळे आपला जिल्हा सर्व सुखसोयींनी युक्त करण्याचे त्यांचे ध्येय आहे तसेच आपल्या अनुभवाचा जिल्ह्याला फायदा व्हावा अशी मनोकामना आहे.
उच्च शिक्षण घेऊनही आपल्या जिल्ह्याबद्दल असलेलं प्रेम आणि ओढ यामुळेच जिल्ह्याच्या सेवेसाठी जिल्ह्यात येऊन अधिकारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती क्वचितच सापडतात. आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अधिकारी म्हणून जिल्ह्याच्या विकासास हातभार लावणाऱ्या अनामिका चव्हाण या त्यापैकीच एक स्त्री-शक्ती…. त्यांच्या जिल्ह्याप्रति असलेल्या आस्थेला आणि कार्याला आमच्याकडून मानाचा मुजरा…आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा..

प्रतिक्रिया व्यक्त करा