You are currently viewing जिल्‍हातंर्गत प्रवास करणाऱ्यांना टोलचा भुर्दंड नको…

जिल्‍हातंर्गत प्रवास करणाऱ्यांना टोलचा भुर्दंड नको…

टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीच्या सभेत ठराव ; टोलनाका जिल्‍ह्‍याच्या सीमेवर हलवा…

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ओसरगाव येथे उभारण्यात आलेला टोल नाका सर्व जिल्‍हावासीयांसाठी त्रासदायक ठरणार आहे. जिल्‍हांतर्गत प्रवास करणारे कुणीही वाहन चालक टोलचा भुर्दंड सहन करणार नाहीत. त्‍यामुळे टोल नाका सिंधुदुर्गच्या हद्दीवर हलवावा असा ठराव आज कणकवलीतील सभेत घेण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ प्रणित टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीची सभा कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात घेण्यात आलीय. या बैठकीला या बैठकीला टोल मुक्‍त संघर्ष समिती अध्यक्ष सतीश लळीत, जिल्‍हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, नंदन वेंगुर्लेकर, काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष इर्शाद शेख, वंचित बहुजन आघाडीचे महेश परुळेकर, नगरसेवक कन्हैया पारकर, विलास कोरगावकर, अशोक करंबेळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या सभेत पुढील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

१)सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्यालयाचे भौगोलिक स्थान लक्षांत घेता जिल्ह्याच्या उत्तरे कडील नागरिकांना आपल्या प्रशासकीय,न्यायीक व आरोग्य विषयक कामांसाठी ओसरगाव टोलनाका प्रत्येक वेळी ओलांडावाच लागणार आहे.

२)जिल्ह्याची मुख्य घाऊक बाजारपेठ या दृष्टीकोनातून कणकवलीचे स्थान लक्षात घेता जिल्ह्याच्या दक्षिणेकडील कुडाळ,सावंतवाडी,वेंगुर्ले,दोडामार्ग या तालुक्यातील नागरिकांना कणकवलीशी जोडणारा अन्य मार्गच उपलब्ध नाही,सबब आपल्या दैनंदिन गरजेसाठी त्यांना प्रत्येकवेळी ओसरगाव टोलनाका ओलांडावा लागणार आहे.

३)झाराप ते खारेपाटण या रा.म.मा क्र.१७च्या चौपदरीकरणाच्या अधीकृत भुमिपुजन कार्यक्रमाचे वेळी केंद्रीय परिवहन मंत्री मा.नितीनजी गडकरी यांनी नियोजित चौपदरीकरण हे टोलमुक्त असेल असे शासनाचे वतीने जाहिर केलेले आहे.

४)जिल्ह्याला उत्तर-दक्षिण जोडणारा अन्य रस्ताच उपलब्ध नाही.

५)नजिकच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरून जिल्हांतर्गत प्रवासासाठी कोल्हापूर जिल्ह्यावासीयांना कुठेही टोल भरावा लागत नाही.

६)सिंधुदुर्गाच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या सिमेला लागूनच असलेल्या गोवा राज्यातून गेलेल्या संपुर्ण महामार्गावर कोणालाच कुठेही टोल द्यावा लागत नाही.

७)जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी अन्य पर्यायच उपलब्ध न ठेवल्याने सदरच्या रा.म.मार्ग क्र६६ वरून नाईलाजास्तव प्रवास करावा लागणाऱ्या नागरिकांकडून सक्तीने टोल वसूली करणे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने व कल्याणकारी राज्याच्या संकल्पने नुसारही अन्यायकारक आहे.

८)केंद्र शासनाच्या पथकर आकारणी विषयक धोरणाला, ‘ज्यास मा.सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली आहे’ अनुसरून महामार्गावरून प्रवास करण्यासाठी पथकर देण्यास आमची हरकत नाही,मात्र जिल्हांतर्गत प्रवासासाठी अन्य पर्यायच उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांना पथकराचा भुर्दंड पडता नये. सबब सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ प्रणित टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीच्या आज२८डिसेंबर२०२२ रोजी कणकवली स्थित एचपीसीएल सभागृहात आयोजीत जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या खुल्या बैठकीत ठराव करण्यात येत आहे, की भारत सरकारने सिंधुदुर्गातील जनतेच्या वतीने मांडलेली उपरोल्लेखीत भुमिका लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा रस्ते परिवहन विभागा कडे नोंदणकृत कोणत्याही वाहना कडून नियोजित ओसरगांव पथकर वसूली नाक्यावर पथकराची आकारणी केली जाऊ नये. किंवा ओसरगाव येथील नियोजित पथकर वसुली नाक्याचे स्थान बदलून सदरचा नाका जिल्ह्याच्या खारेपाटण सिमेवर हलवावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा