दुर्गा मातेसमोर फोडलेल्या नारळाची सावंतवाडीत जोरदार चर्चा….

दुर्गा मातेसमोर फोडलेल्या नारळाची सावंतवाडीत जोरदार चर्चा….

अच्छेदिन ची स्वप्ने दाखवणाऱ्या नेत्याच्या फसवणुकीतून घडला प्रकार..

नवरात्रोत्सव सुरू झाला परंतु सावंतवाडीत दरवर्षी दिसणारी गर्दी, तरुणाईचा उत्साह मात्र कोरोनाच्या संकटामुळे दिसला नाही. कोरोनाच्या संकटातही दरवर्षी प्रमाणे सर्वच मंडळांनी देवीची स्थापना केली आणि पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. सौभाग्यवती देवीच्या ओट्या भरण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आल्याच, अनेकांनी देवीवरील श्रद्धेपोटी मागच्या वर्षी केलेले नवस फेडण्यासाठी देवीच्या मंडपात हजेरी लावली. बाजारपेठ मित्रमंडळाच्या देवीकडे अनेक भाविक दरवर्षी नवस करतात आणि मनोकामना पूर्ण झाली की आठवणीने त्याची परतफेड सुद्धा करतात. बाजारपेठ मित्रमंडळाच्या देवीकडे केलेले नवस पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे, आणि देवीच्या मंडपात वर्षानुवर्षे सेवा करणारे कार्यकर्ते, भक्त आवर्जून नवस करतात.
मात्र सावंतवाडीत चर्चेचा विषय झाला तो देवीच्या सेवेत वर्षानुवर्षे असणाऱ्या एका भक्ताने नारळ फोडून आज केलेल्या नवसाची, देवीकडे मागितलेल्या मागण्याची… त्या भक्तांच्या विचित्र मागणीमुळे सावंतवाडीत आजचा नारळ फोडण्याचा विषय अत्यंत कुतूहलाने चघळला जात आहे, आणि त्या भक्ताने देवीकडे असे विचित्र मागणे का मागितले याचाच प्रत्येक सावंतवाडीकर शोध घेत आहे.
देवीकडे नारळ फोडणाऱ्या या भक्ताने मागणे मागताना सावंतवाडी शहरात अच्छेदिन आणण्याची स्वप्ने दाखवणाऱ्या एका नेत्याने त्याची घोर फसवणूक केली आणि त्यामुळे त्याचे आयुष्य आणि कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने फसवणूक करून आपल्याला दुःखाच्या खाईत लोटणाऱ्या त्या नेत्याचा सत्यानाश कर असंच मागणं देवीच्या समोर नारळ फोडून मागितले. काही वर्षांपूर्वी या नेत्याने आपल्या मित्राकडून म्हणजे त्या देवीच्या भक्ताच्या नावावर एका बँकेकडून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु कर्ज दुसऱ्याच्या नावावर असल्याने बेफिकीर राहिलेल्या या नेत्याने कर्जाची परतफेड न केल्याने आजमितीस ते कर्ज आणि व्याज वाढून ९० लाखांच्या घरात पोचले. त्यामुळे ज्या मित्राच्या नावावर कर्ज घेतले तो मात्र भयंकर आर्थिक संकटात सापडला मात्र कर्ज घेऊन मौज करणारा अच्छेदिन वाला नेता मात्र सावंतवाडीत अच्छेदिन आणण्याची स्वप्ने दाखवण्यात मश्गुल राहिला त्यामुळे आपल्यासमोर वाढलेल्या अडचणींच्या डोंगरामुळे एकेकाळी मित्र असलेला तो देवीचा भक्त प्रचंड मानसिक तणावाखाली आला. कर्ज घेणाऱ्या नेत्याने त्याच्या कर्ज फेडीसाठीच्या विनवण्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्या भक्ताने नवसाला पावणाऱ्या आणि आपल्याला संकटातून सोडवू शकणार अशी अपार श्रद्धा असणाऱ्या बाजारपेठ मित्रमंडळाच्या देवीसमोर नारळ फोडत आपल्याला फसवणाऱ्या त्या अच्छेदिन दाखवणाऱ्या नेत्याचा सत्यानाश कर असं अगतिक होत मागणे मागितले.
सावंतवाडी सारख्या छोट्याशा शहरात छोट्या छोट्या घटनांची खबर वाऱ्यासारखी पसरते, तशीच देवीसमोर नारळ फोडून मागणे मागण्याची खबर वाऱ्यासारखी पसरली आणि सावंतवाडी शहरात तो फसवणूक करून मित्राला सुद्धा आयुष्यातून उठवणारा अच्छेदिन वाला नेता कोण? अशीच चर्चा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा