You are currently viewing सोहळा

सोहळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*सोहळा…..*

गोधडीची ऊब किती थंडी मध्ये छान
गहू आणि हरबऱ्याने टरारते रान
हिर्वागार हरबरा सोनसळी गहू डोले
कोवळ्या हुरड्या सोबत हरबऱ्याचे सोले..

बांधावरती बसावे नि पेटवावा जाळ
जुडी हरबऱ्याची फुटे तोंडातच सुटे लाळ
खरपूस गव्हात टाका भरपूर तीळ
गोणपाटावर चोळून काढा गरमागरम मेळ…

हरभरे खाता होती ओठ मस्त काळे
गहू तीळ खाता धष्टपुष्ट होती बाळे
थंडीचा हा मेवा खावा बांधावरती बसून
भरीत भाकरी खावी भरपूर टाकून लसूण…

शेतातील कांदा फोडा तिथे बुक्की मारून
चविष्ट त्या भाकरीने पोट जाईल भरून
अहा! अहा! डोळ्यांसमोर येते पहा रान
शेत आणि बांधाची हो वेगळीच शान..

झुळूझुळू लिंबाखाली लागतो मग डोळा
गार मंद हवेचा तो सुखद सोहळा
त्या साठी जावे लागते शेतावरच पहा
हिर्व्यागार रानाचे ते सुख असते महा…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २७/१२/२०२२
वेळ: सकाळी ९:०५

प्रतिक्रिया व्यक्त करा