जामसंडे येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
देवगड
रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदान करणारे दाते हे देशाच्या सैनिकांप्रमाणे आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा, असे आवाहन सेवानिवृत्त उपविभाग पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी केले. जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कुलच्या नलावडे सभागृहामध्ये सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान देवगड शाखेच्यावतीने देवगड तालुक्यामधील सातत्याने रक्तदान घेणाऱ्या रक्तदान मंडळांचा तसेच रक्तदात्यांचा व महिला रक्तदात्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी आमदार अजित गोगटे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान देवगड शाखेचे अध्यक्ष हिराचंद तानावडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, पंढरीनाथ आचरेकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान देवगड शाखेचे प्रविण जोग, विजयकुमार जोशी, उध्दव गोरे, पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे, प्रकाश जाधव, रेश्मा जोशी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान देवगड शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना गवस म्हणाले की, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान देवगड शाखेने अभुतपुर्व असा आगळा वेगळा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करुन खऱ्या अर्थाने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे व रक्तदान शिबिरे आयोजित करणाऱ्या मंडळांचे खरे कौतुक केले आहे. कोरोना विषाणूमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रक्ताची गरज प्रचंड प्रमाणात होती. मात्र हि गरज सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गने कमी पडू दिलेली नाही. कोरोना विषाणूमध्ये देखील अनेक शिबिरे आयोजित करुन रक्तपेढीमध्ये रक्तजमा करण्याचे काम करुन अनेकांचे प्राण या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने केले आहे. देशाच्या सिमेवरती जसे सैनिक लढत आहेत. त्याचप्रमाणे आपले कर्तव्य रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी करीत आहेत. असे त्यांनी सांगितले.
यावेळी देवगड तालुक्यातील रक्त्दान शिबिरे आयोजित करणाऱ्या ६० हुन अधिक मंडळांचा सत्कार करण्यात आला. तसेच २० हुन अधिकवेळा ज्या व्यक्तींनी रक्तदान केले त्या व्यक्तींचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. तसेच दुर्मिळ रक्तगटाच्या रक्ताची गरज ज्यावेळी भासते त्या त्या वेळी रक्तदान करणाऱ्या व्यक्तींचा देखील सत्कार करण्यात आला. यावर्षी देवगड तालुक्यामध्ये सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून ११७३ यावर्षी रक्तपिशव्या विविध मंडळाच्या माध्यमातून जमा करण्यात आल्या. तसेच ७५ वेळा रक्तदान करणारे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचेच उध्दव गोरे यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान देवगड शाखेचे अध्यक्ष हिराचंद तानावडे यांनी अपले मनोगत व्यक्त करतेवेळी म्हणाले की, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान देवगड शाखेच्या पदाधिका-यांची एकजुटीची कामगिरीच्या जोरावरती आपण अनेक मंडळांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे घेत आहोत. तालुक्यातील अनेक रक्तदाते हे अनेक रुगणांचे प्राण वाचवित आहेत. अश्या या रक्तदात्यांचे व आपल्या मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांचे मन भरुन कौतुक केले अशीच एकजुट व कर्तुत्वाची आस असल्यास अशक्य देखील शक्य करता येते असे त्यांनी सांगितले. यावेळी संपुर्ण देवगड तालुक्याच्या विविध स्तरामधून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान देवगड शाखेच्या पदाधिका-यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले या कार्यक्रमांचे प्रास्ताविक दुखंडे, सुत्रसंचालन रेश्मा जोशी व विजयकुमार जोशी तर आभार प्रकाश जाधव यांनी मानले.