पतीकडून पत्नीचे मुंडण

पतीकडून पत्नीचे मुंडण

 

उत्तर प्रदेशातील बदायूँमध्ये पतीने पत्नीवर केलेल्या अत्याचाराची घटना घडली आहे. काकांच्या अंत्यसंस्काराला जाण्याचा हट्ट धरणा-या पत्नीला पतीने बेदम मारहाण केली. तिचे मुंडन करून तिला खोलीत कोंडून ठेवले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

बिसौली येथे ही घटना घडली. काकाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी तिथे जाण्याचा हट्ट महिलेने धरला होता. यावरून पतीला राग आला आणि त्याने तिला बेदम मारहाण केली. तसेच त्यानंतर तिचे मुंडन करून तिला खोलीत कोंडून ठेवले. सोमवारी त्या महिलेने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली आणि ती आपल्या काकीच्या घरी पोहोचली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महिलेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सीमा देवी (वय ३१) असे पीडित महिलेचे नाव असून, तिने आपला पती राजपाल याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पतीकडून दररोज मारहाण आणि शिवीगाळ होत असल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. या दाम्पत्याचे लग्न नऊ वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना एक मुलगा आहे. पती मारहाण आणि शिवीगाळ करतो आणि त्याचे पालक त्याला पाठिंबा देतात, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

माझ्या वडिलांच्या मोठ्या भावाचे १७ ऑक्टोबरला निधन झाले. ते माझ्या वडिलांसारखे आहेत. शेवटच्या क्षणी त्यांना पाहायचे होते. मात्र, त्यांच्या अंत्यसंस्काराला जाण्यापासून पतीने रोखले. पण मी हट्ट धरला. त्यावेळी त्याने मला मारहाण केली. माझे मुंडन करून मला कोंडून ठेवले. माझ्या सासू-सास-यांनी माझी सुटका केली नाही. मला सासरी जायचे नाही. माझ्या जीवाला धोका आहे, असे पीडितेने पोलिसांना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा