पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणूनच राहणार -आ. वैभव नाईक
मालवणात शिवसेना पक्षाच्या २१ सरपंच व ग्रा.प.सदस्यांचा अरुण दुधवडकर,आ. वैभव नाईक,संदेश पारकर यांच्या हस्ते सत्कार
शिवसेना पक्षाच्या खडतर परिस्थितीत आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी व उमेदवारांनी एकजुटीने काम करून मालवणात शिवसेना पक्षाचे २१ सरपंच व मोठ्या संख्येने ग्रा. प. सदस्य निवडून आणले हे खरोखरच कौतुकास्पद आहे.आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेच्या माध्यमातून गावागावात केलेल्या विकासकांमुळे जनता शिवसेनेच्या पाठीशी राहिली. मंत्रीपद आणि खोक्यांची ऑफर असूनही आ. वैभव नाईक यांनी शिवसेना सोडली नाही. आ. वैभव नाईक यांच्यासारखा निष्ठावंत लोकप्रतिनिधी कुडाळ मालवणला लाभला यांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.
मालवण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच, ग्रा. पं. सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार रविवारी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,आमदार वैभव नाईक,शिवसेना नेते संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते वायरी येथील आर जी. चव्हाण सभागृहात करण्यात आला. जनतेने शिवसेनेच्या ताब्यात दिलेल्या ग्रा. पं. ना प्रत्येकी यावर्षी २५ लाख रुपये निधी देण्याची घोषणा आ. वैभव नाईक यांनी करून याची सुरुवात म्हणून पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपये निधी प्रत्येक ग्रामपंचायत ला देत असल्याचे सांगितले.
यावेळी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, यतीन खोत, मंदार ओरसकर, बाळ महाभोज, शिल्पा खोत, दिपा शिंदे, बाबा सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, अरुण लाड, कमलाकर गावडे, बंडू चव्हाण, पिंट्या गावकर, विजय नेमळेकर, अमित भोगले, तपस्वी मयेकर, नरेश हुले, गणेश तोंडवळकर, समीर लब्दे, चंद्रकांत गोलतकर यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, लोकप्रतिनिधी झाल्यानंतर अनेक ऑफर येत असतात. मात्र ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आहे, त्यांचा कधीच विश्वासघात करायचा नसतो. मला देखील आमदार असल्यामुळे ५० कोटींची आणि मंत्रीपदाची ऑफर आली होती.मात्र मी ती स्वीकारली नाही. ठाकरे कुटुंबिय आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना त्रास देण्याचे षडयंत्र सध्या राज्यात सुरू आहे. कितीही दबाव आला तरी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभा राहणार आहे. मी फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असून त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या शक्तीवर आज आमदार बनलेलो आहे, असे आ. वैभव नाईक यांनी सांगून निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे काय यासाठी भाई गोवेकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले.
ग्रा. पं. निवडणुकीत भाजपाकडून शिवसेनेच्या उमेदवारांना फोडण्यासाठी थेट वैयक्तीक पातळीवर त्रास दिला गेल्याचा आरोप आ. वैभव नाईक यांनी केला. सरपंच पदाच्या उमेदवारांनी आणि सदस्यांनी दबावाला बळी न पडता त्यांच्या पाठिशी स्थानिक शिवसैनिक असल्याने त्यांनी विरोधकांना जागा दाखवून दिली. रेवंडी, तोंडवळी याठिकाणी काही वाळू व्यावसायिकांना धमकी देण्यात आली. कोळंब सरपंच यांना तर थेट ब्युटीपार्लर घालून देण्याचीही ऑफर देण्यात आली यातून भाजपला सत्तेची मस्ती आल्याचे दिसून येत आहे. सर्व निवडणूका पैशांच्या जोरावर जिंकू ही त्यांची मानसिकता आता मतदारांनी मोडून काढली आहे असेही आ. वैभव नाईक म्हणाले. शिवसेने सोबत २१ सरपंच असून गाव पॅनल मधील आणखी काही सरपंच सोबत येतील असा दावा आमदार वैभव नाईक यांनी या कार्यक्रमात केला. तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत १०० टक्के यश मिळवण्याचा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
संदेश पारकर, भाई गोवेकर,हरी खोबरेकर, मंदार केणी यांनी विचार मांडताना निवडून आलेल्या सरपंच सदस्यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता शिवसेना पक्षासाठी प्रामाणिक काम करण्याचे त्यांनी आव्हान केले. सध्याचे राज्य सरकार घटना बाह्य असून लवकरच हे सरकार कोसळून आपले सरकार येणार आहे.काही अडचणी असतील त्या पक्ष नेतृत्वाच्या कानावर घाला. सरपंच यांनी आपले अधिकार व नियमांचा अभ्यास करूनच कामकाज करा असे आवाहन केले.