*महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते यशस्वी भव या करिअर मार्गदर्शन पुस्तकाचे प्रकाशन*
दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना बऱ्याच पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये करिअर कोणते निवडावे याबाबत संभ्रम असतो. याच प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांना ठामपणे घेता यावे, म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र प्राध्यापक राजाराम परब यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील अनुभव आणि वीस हजार हून अधिक विद्यार्थ्यांना करियर कौन्सिलिंग केल्याचा अनुभव एकत्र आणत यशस्वी भव हे पुस्तक लिहिले आहे. आज नाताळाच्या निमित्ताने सावंतवाडीतील विविध विकास कामांचा श्री गणेशा करण्यासाठी सावंतवाडी येथे उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक भाई केसरकर यांच्या हस्ते यशस्वी भव पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना केसरकर साहेब म्हणाले की ” परफेक्ट अकॅडमी च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर करण्यासाठी, तसेच त्यांना योग्य करिअरची दिशा देण्यासाठी प्राध्यापक राजाराम परब घेत असलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे विशेष कौतुक आहेच, पण आता यशस्वी भव या पुस्तकाच्या माध्यमातून परपसर विद्यार्थ्यांच्या हातात विविध क्षेत्रातील करिअर कसे निवडावे यासंबंधी सूत्रबद्ध पद्धतीने माहिती देत आहेत. विद्यार्थ्यांनी याचा योग्य वापर केल्यास त्यांना योग्य वयात योग्य करिअर निवडणे सोपे जाईलच, पण त्या क्षेत्रात असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्याची ही तयारी त्यांना करता येईल.”
यशस्वी भव या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना दहावी बारावीनंतर निवडता येणाऱ्या आणि पुढे यशस्वी करिअर करू शकतात अशा 32 प्रमुख क्षेत्राबद्दल तर जवळपास दीडशेहून अधिक उप क्षेत्रांबद्दल सविस्तर माहिती, जसे संबंधित करिअर साठी दहावीनंतर कोणती शाखा निवडावी, बारावी नंतर कोणता कोर्स करावा, त्यासाठी प्रवेश परीक्षा आहे का, असल्यास त्या प्रवेश परीक्षा संदर्भात माहिती व त्याची तयारी कशी करावी, या कोर्सेस साठी असणारी शासकीय आणि खासगी महाविद्यालय आणि त्यांची फी, तसेच कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात नोकरी मिळू शकते किंवा व्यवसाय करता येतो आणि किती वेतन मिळू शकते यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.