*सावंतवाडीतील एसटी गॅरेजमध्ये केलेली गाडी दुरुस्त*
सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीनंतर सावंतवाडी या संस्थानकालीन शहरातच जेल, कोर्ट आदी मुख्य इमारती होत्या त्यामुळे सावंतवाडी शहराने जसे सौंदर्य जवळून पाहिलं तसेच कुख्यात गुंड, आरोपी देखील पाहिलेत. जिल्ह्यात घडलेल्या खून खटल्यातील आरोपी देखील कडेकोट बंदोबस्तात आणताना नेताना सावंतवाडीत त्यांना पहायला गर्दी व्हायची. असाच देशातील एक कुख्यात आरोपी ज्याने एकेकाळी अनेक खून केले, दरोडे घातलेत, कित्येक बायकांना नादी लावले तो चार्ल्स शोभराज देखील पोलिसांनी पकडून, बांधून गाडीच्या सीटवर झोपवून, त्यावर दोन पोलिस शिपाई बसवून गोव्यातून मुंबईत नेत असताना सावंतवाडीत पोलिसांची गाडी बंद पडली होती. त्यावेळी रात्री ३.०० वाजता पोलिस आहेत हे समजल्यावर सावंतवाडीच्या एसटी डेपोतील मेकॅनिकने गाडी दुरुस्ती करून दिली होती अशी आठवण त्यावेळी शोभराजला पकडणारे पोलिस अधिकारी मधुकर झेंडे यांनी सांगितली.
मुंबईत १९७१ साली पीएसआय मधुकर झेंडे यांनी चार्ल्स शोभराजला प्रथम पकडले होते. चार्ल्स शोभराजने अनेक मोठमोठ्या स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न करतो अशी बनवाबनवी करत कधी सोने घेण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सला लुटले होते, कधी पाण्यातून औषध, कधी ड्रिंक्स मधून विषारी द्रव देऊन बँका लुटल्या, खून केले तर कधी आपला वाढदिवस आहे असा बनाव करून केक मधून विषारी औषध देत तिहार जेल मधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. परंतु मधुकर झेंडे यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी अतिशय शिताफीने पार पाडत १९८६ मध्ये गोव्यातील एका हॉटेलमध्ये चार्ल्स शोभराजच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर चार्ल्स १९९७ पर्यंत तुरुंगात होता. चार्ल्सकडे मुलींना भुल पाडण्याची कला होती. नेपाल मध्ये तर तो जेलमध्ये असताना मुलीने त्याच्याशी लग्न केलं होतं. चार्ल्सला पकडणारे मधुकर झेंडे यांनी आपल्या कारकीर्दीत दाऊद वगळता बाबू रेशीम, अरुण गवळी, हाजी मस्तान, टायगर मेनन, करीम लाला, अमर नाईक सर्वांना पकडले होते. परंतु चार्ल्स शोभराजला दोन वेळा पकडल्यामुळे मधुकर झेंडे यांना फार प्रसिद्धी मिळाली होती. आता चार्ल्स शोभराज जेल मधून सुटत असताना सावंतवाडीत त्यावेळी चार्ल्सला आणल्याच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.