You are currently viewing मालवणात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी पालिकेने मोहीम राबवावी

मालवणात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी पालिकेने मोहीम राबवावी

महेश कांदळगावकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी…

मालवण

शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. सध्या पालिका निवडणुका झालेल्या नाहीत. पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम राबवण्यात यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव लक्षात घेता त्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम २०१७ मध्ये आमच्या काळात घेण्यात आली होती. त्यानंतर पुनः २०२१ मध्ये अशा प्रकारची मोहिम हाती घेऊन सुमारे ५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते. त्यामुळेच काही प्रमाणात भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर उपाययोजना करता आली. पुढील काही वर्षे सातत्याने ही मोहीम सुरू ठेवली तर नक्कीच एक दिवस यावर कायमस्वरूपी उपाययोजना होऊ शकेल. अजून पालिकेच्या निवडणूका झालेल्या नाहीत. पालिकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. तरी मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांना देण्यात आले आहे, अशी माहिती श्री. कांदळगावकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा