You are currently viewing विद्यार्थ्यांनी सजग ग्राहक बनावे- प्रा.श्री.एस.एन.पाटील

विद्यार्थ्यांनी सजग ग्राहक बनावे- प्रा.श्री.एस.एन.पाटील

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कॉमर्स असोसिएशन आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र-सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन

वैभववाडी महाविद्यालयात विद्यार्थी ग्राहक प्रबोधन कार्यक्रम संपन्न.

वैभववाडी

जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक आहे. आपल्याला दैनंदिन जीवनात लागणा-या वस्तू आणि सेवा खरेदी करणारी व्यक्ती ही ग्राहक संज्ञेमध्ये मोडते. ग्राहक ही संज्ञा खुप व्यापक असून शाळा-महाविद्यालयामध्ये शिकणारा विद्यार्थी सुध्दा ग्राहकच आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी गि-हाईक न बनता सजग ग्राहक बनावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सदस्य व संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले.

दि.२४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील कॉमर्स असोसिएशन आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र-सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ सी.एस.काकडे यांच्या अध्यक्षतेखाली केले होते.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.ए.एम.कांबळे, प्रमुख वक्ते प्रा.श्री.एस.एन.पाटील, कॉमर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.आर बी पाटील, प्रा.डॉ.एम.आय.कुंभार व प्रा.राहुल भोसले उपस्थित होते.

दि.२४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन किंवा भारतीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. २४ डिसेंबर,१९८६ रोजी केंद्र सरकारने या कायद्याला मंजुरी दिली आणि ग्राहक संरक्षण हितासाठी हा स्वतंत्र कायदा लागू झाला. या कायद्याने प्रत्येक नागरिकाला दिलेले सहा मुख्य हक्क समजून घेऊन जीवनात उपयोगात आणले पाहिजेत.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून राज्य,
विभाग, जिल्हा व तालुका पातळीवर ग्राहक संघटन, प्रबोधन व योग्य मार्गदर्शन केले जात आहे. अर्थव्यवस्थेच्या पंचप्राणापैकी ग्राहक हा महत्त्वाचा घटक आहे. ग्राहक केंद्रबिंदू मानून काम करणारी ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही एकमेव संस्था आहे. प्रा.पाटील यांनी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
ग्राहकाची फसवणूक होण्यास ग्राहक जबाबदार असतो. कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करताना डोळसपणे केली पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात प्रा.ए.एम.कांबळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राहुल भोसले यांनी केले तर आभार डॉ.एम.आय.कुंभार यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा