चेकपोस्टवरील सलग १३ दिवसाच्या ड्युटीबाबत शिक्षक भारतीचा अक्षेप
दिवस कमी न झाल्यास शिक्षक भारतीचा ड्युटीवर बहिष्काराचा इशारा

चेकपोस्टवरील सलग १३ दिवसाच्या ड्युटीबाबत शिक्षक भारतीचा अक्षेप

कोवीड -१९ अंतर्गत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या खारेपाटण, करूळ व आंबोली तसेच विविध रेल्वे स्टेशनवर ज्या शिक्षकांना 13 दिवसाच्या ड्यूट्या लावण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या ड्यूटीचे दिवस कमी करण्यात यावेत. सध्या कोकणातील प्रत्येक माणसासाठी अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सवाचा काळ विचारात घेऊन ही ड्युटी कमीत कमी चार दिवसाची करण्यात यावी तसेच
कोवीड-१९ अंतर्गत कोणतीही ड्युटीपुर्ण झाल्यानंतर सदर शिक्षकाला कार्यमुक्त, करण्यात यावे व त्या आशयाचे पत्र संबंधित, शिक्षकांच्या शाळेकडे पाठविण्यात यावे अशी मागणी शिक्षक भारतीचे राज्य प्रमुख कार्यवाहक तथा जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
कोरानाची ड्युटी लावताना शिक्षकांच्या शाळेचे अंतर लक्षात घेण्यात यावे.

चेकपोस्टवर ड्यूटी बजावत असताना यापुर्वी काही शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने ड्युटी बजावणाऱ्या शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेशी साधने उपलब्ध करून द्यावीत, ड्यूटी पुर्ण होताच शिक्षकांना होम काॅरंटाईनचे लेखी आदेश देण्यात यावेत. एकदा ड्यूटी केल्यानंतर तीच ड्युटी त्यांना पुन्हा लावू नये. आतापर्यंत
कोवीड-१९ अंतर्गत कोणत्याही ड्युटी बाबत शिक्षकांनी नकार दिला नाही.आणि कधीही देणार नाहीत पण,शिक्षकांच्या समस्यांकडे प्रशासन कानाडोळा करून फक्त नियमांचा आधार घेत ड्यूटीच करून घेत असेल तर या ड्युटीवर शिक्षक भारती संघटनेच्यावतीने बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा शिक्षक भारती चे राज्य प्रमुख कार्यवाहक तथा जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा