कुडाळ :
सांघिकता खेळ घडवते व सांघिक प्रयत्नाने देशही घडतो. प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीसाठी सांघिक कार्य महत्त्वाचे असते. खेळ तर त्याच्या उपयोजनाचे महत्त्वाचे क्षेत्र आहे”. असे उद्गार कुडाळचे नायब तहसीलदार श्री कमलाकर दाभोलकर यांनी काढले. ते बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतांमध्ये “कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभाग घेताना यश -पराजय खिलाडू वृत्तीने स्वीकारण्याची मानसिकता स्पर्धेला निकोपता बहाल करते. आपल्यातील सुप्त गुण झाकून न ठेवता त्या अशा प्रकारच्या स्पर्धातून प्रकाशात आणावेत. जेणेकरून अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रातही आपला नावलौकिक वाढविता येतो.” असे सांगत या क्रीडा स्पर्धेच्या उत्तम आयोजनाबद्दल संस्थाचालक उमेश गाळवणकर व त्यांचे सीबीएसई बोर्डाच्या सेंट्रल स्कूलचे सर्व शिक्षकवृंद व क्रीडा विक्रम सिंह शिक्षक यांचे अभिनंदन करून संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, जीएसटी विभागाचे डेप्युटी कमिशनर श्री खोबरेकर, डॉक्टर गुरुप्रसाद सौवदत्ती, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य शुभांगी लोकरे, उपप्राचार्य विभा वझे, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कल्पना भंडारी, महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता गाळवणकर, क्रीडाशिक्षक विक्रम सिंह इत्यादी उपस्थित होते.
प्रा अरुण मर्गज यांनी आपल्या मनोगतात “खिलाडू वृत्तीने खेळ खेळल्यास संघ भावना वाढीस लागते. व खेळण्यातला आनंद मनमुरादपणे घेता येतो. असे सांगत कुणीतरी जिंकण्यासाठी कोणीतरी हराव लागतं याचं भान ठेवून स्पर्धांमध्ये सहभागी व्हा.आंनंद लुटा”. असे सांगत स्पर्धेला, क्रीडा महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
आकाशात रंगीत फुगे सोडून, दीप प्रज्ज्वलन करून व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमामध्ये गणेश वंदना व कथ्थक या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणातून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
लाल घर, हिरवं घर व पिवळे घर अशा विविध विभागात सुरू झालेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी तालबद्ध संचलने केले व त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते टॉस उडवून कबड्डी खेळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रचंड उत्साहाने विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना विजयी स्पर्धकांना विशेष बक्षीस समारंभामध्ये गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी लोकरे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा ठाकूर यांनी केले.