You are currently viewing जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी द्यावी

जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी द्यावी

अस्थायी कृती समितीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय महामार्गवर जिल्ह्यातील वाहनाना टोल माफी मिळावी. व सिंधुदुर्गातील पथकर वसुलीला विरोध दर्शविणारे निवेदन आज टोलमुक्त सिंधुदुर्ग अस्थायी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

सिधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या रा.म.मार्ग क्र. ६६च्या झाराप ते खारेपाटणपर्यंतच्या टप्याची पुनर्निर्मिती जवळपास ९७% पुर्ण झाल्याने केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालय व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी ठेकेदार नियुक्त करून पथकर वसुलीची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. काही दिवसात ती कार्यान्वित होत असल्याचे प्रसारमाध्यमातून समजत आहे. या महामार्ग चौपदरीकरणाच्या निमित्ताने कुडाळ येथे आयोजित जाहिर सभेत मा. केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री महोदयांनी सदरचा महामार्ग हा शासननिर्मित असल्याने पथकर मुक्त राहील, असे स्पष्टपणे घोषित केले होते.

पथकरातून महामार्गाचा खर्च वसूल करण्यासही हरकत नाही; मात्र या सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाची जागा आणि जिल्ह्याचा भौगोलिक नकाशा लक्षात घेतला तर जिल्ह्याच्या उत्तर भागातील देवगड, वैभववाडी आणि कणकवली या तीन तालुक्यांतील नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्यास पर्यायी सोयीस्कर मार्गच नसल्याने पथकराने अधिकचा भुर्दंड पडणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूरनंतरची कणकवली बाजारपेठ हीच जिल्ह्याच्या घाऊक किराणा व्यापाराची मुख्य बाजारपेठ असल्याने उर्वरीत दक्षिण सिंधुदुर्गातील नागरिकांना या पथकरामुळे अधिकच्या महागाईला तोंड द्यावे लागणार आहे.

याच बरोबर जिल्ह्यांतर्गत उत्तर-दक्षिण रहदारी साठी अन्य पथकरमुक्त असा पर्यायी मार्गच उपलब्ध नाही, जो मार्ग जुन्या एन एच १७ च्या रूपाने उपलब्ध होता. त्याचेच रूपांतर आता या पथकरयुक्त चौपदरी एनएच ६६ मध्ये केले आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाने व कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेनुसार नागरिकांना किमान पायाभूत सुविधा पुरविणे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र या संकल्पनेलाच छेद देत सिंधुदुर्गवासियांच्या जिल्हातर्गत संपर्कासाठी मुळातच अस्तित्वात असलेल्या हक्काच्या पथकर मुक्त एनएच. १७ ची सुविधा काढून घेऊन त्या बदल्यात पथकराचा भुदंड देणारा चौपदरी महामार्ग जबरदस्तीने वापरण्यास भाग पाडणे कोणत्याही दृष्टीने योग्य ठरत नाही.

यासाठीच जिल्ह्यातील जनता आता टोलमुक्त सिंधुदुर्गसाठी एकवटली आहे. या टोलमधुन एमएच ०७ नोंदणी झालेल्या व जिल्ह्यातील पत्त्यावर परिवहन कार्यालयात नोंदणी झालेल्या अन्य सिरीजच्या वाहनांना टोलमधुन वगळावे, अशी आमची ठाम आणि आग्रही मागणी आहे. याचबरोबर जिल्हांतर्गत वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करुन द्यावा, सिधुदुर्गातील रहिवाशांना नियोजित पथकरापासून मुक्तता द्यावी अन्यथा जिल्ह्याचा उत्तर दक्षिण दुवा साधणारा आमचा पुर्वी पथकरमुक्त मार्ग परत करावा, अशी विनंती आपणास सिंधुदुर्गातील तमाम बांधवाच्या वतीने करीत आहोत. आमची ही भावना शासनापर्यंत पोचवावी, अशी विनंती आहे. टोलमुक्तीचे आमचे हे आंदोलन सर्वसमावेशक असुन सनदशीर व लोकशाही मार्गाने जाणारे शांततामय आंदोलन आहे. मात्र शासनाने त्याची दखल न घेतल्यास आम्हाला नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल, असे जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी जयकृष्ण फड यांच्याकडे सादर केले. यावेळी टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीचे निमंत्रक नंदन वेंगुर्लेकर सतीश लळीत नितीन वाळके मनोज वानवलकर नामदेव मटकर संतोष कदम संजय पवार आधी पदाधिकारी उपस्थित होते.

२८ डिसेम्बर रोजी बैठक
जिल्ह्यातील टोल मुक्तीच्या अनुषंगाने बुधवार २८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता एचपीसीएल सभागृह कणकवली येथे टोलमुक्त सिंधुदुर्ग याबाबत पुढील नियोजन, दिशा व विचारविनिमय करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेस जिल्ह्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, सदस्य तसेच सिंधुदुर्ग वासियांनी उपस्थित राहावे. असे आवाहन टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीच्या वतीने सतीश लळीत व नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा