ओरोस
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे श्री पंचम खेमराज महाविद्यालय व विधी महाविद्यालय, सावंतवाडी येथे शनिवार २४ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजता ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जाणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गचे सचिव न्या. दीपक म्हालटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर व पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय ग्राहक दिवस हा ग्राहकांना मिळणाऱ्या निकृष्ट वस्तुंबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी घेण्यात येतो. काहीवेळा मोठी किंमत देऊन वस्तू निकृष्ट निघूनही त्या ग्राहकाला बदलून दिल्या जात नाहीत किंवा त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्या. म्हालटकर यांनी केले आहे.