सिंधुदुर्गनगरी
भारत सरकारच्या विविध योजना राबविन्यासाठी विकसित केलेल्या यु डायस प्लस २०२२-२३ टप्पा १ मध्ये शाळांची ऑनलाईन माहिती भरण्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमाक मिळविला आहे. सन २०१८ -१९ पासून सलग पाचव्यांदा जिल्हा अव्वल ठरला आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी आज दिली.
भारत सरकारच्या विविध योजना राबविण्यासाठी आवश्यक माहिती प्राप्त होण्यासाठी यु-डायस प्लस” ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सन २०२२-२३ पासून यु डायस प्लस मध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहेत. पहिल्या टप्यामध्ये शाळांच्या भौतिक सुविधांची पायाभूत माहिती. व शिक्षक माहिती घेण्यात आली आहे. टप्पा दोन मध्ये विद्यार्थीनिहाय माहिती घेण्यात येणार आहे. यु डायस प्लस २०२२-२३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. यु डायस प्लस प्रणाली मध्ये ऑनलाईन माहिती भरण्यामध्ये सन २०१८-१९ पासून २०२२-२३ पर्यंत सलग पाचव्यांदा आपला जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
यासाठी जि प मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन महत्वाचे ठरले.. यु डायस प्लस २०२२-२३ टप्पा १ मध्ये ऑनलाईन माहिती भरण्यासाठी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, डॉ. मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी( माध्यमिक), यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष बैठकी घेवून तसेच व्ही.सी. द्वारे ऑनलाईन बैठका घेवून मार्गदर्शन केले.
ऑनलाईन माहिती भरण्यामध्ये जिल्हा अव्वल राहिल्याबाबत शत्रुघ्न चव्हाण (संगणक प्रोग्रामर), समग्र शिक्षाचे सर्व तालुक्यांचे डाटा एंट्री ऑपरेटर व एम.आय.एस. को ऑडिनेटर विशेषतज्ञ (IE), विषयतज्ज्ञ तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटसमन्वयक, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी अभिनंदन केले आहे व यापुढेही जिल्हा राज्यात अव्वल राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
राज्यातील सर्व शाळांची माहिती ” यु डायस प्लस’ या ऑनलाईन प्रणाली द्वारे संगणकीकृत करण्यात येते. या माहितीचा उपयोग भारत सरकारच्या शालेय शिक्षण विभाग, शिष्यवृत्ती विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, मध्यान्ह भोजन योजना या विभागातील योजना राबविताना केला जातो.