You are currently viewing नशेपासून दूर रहा- प्रसन्नजीत चव्हाण

नशेपासून दूर रहा- प्रसन्नजीत चव्हाण

नशेपासून दूर रहा- प्रसन्नजीत चव्हाण

वैभववाडी

आज प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्यसन करीत असतो. व्यसन आणि नशा यामधील फरक समजून घेतला पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे व्यसन. अनेक वेळा चहा पिणे, भरपूर झोपणे व भरपूर अभ्यास करणे या गोष्टी व्यसनामध्ये येतात.परंतु नशेसाठी अनेक पेये आणि मादक पदार्थांचे सेवन केले जाते. नशेतून आयुष्याची बरबादी होते या सर्व गोष्टींची माहिती आजच्या तरुण पिढीने करुन घेतली पाहिजे असे आवाहन वैभववाडीचे तहसीलदार श्री. प्रसन्नजीत चव्हाण यांनी केले.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई,शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने “नववर्ष धुंदीत नव्हे, शुद्धीत साजरे करा” या अभियान उद्घाटनपर कार्यक्रम दत्त मंदिर वैभववाडी येथे वैभववाडीचे तहसीलदार श्री.प्रसन्नजीत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव, वैभववाडीचे गटविकास अधिकारी श्री. जयप्रकाश परब, वाभवे-वैभवाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री.सुरज कांबळे, वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईणकर, नगरसेवक श्री. बबलू रावराणे, पुरवठा अधिकारी श्री.रामेश्वर दांडगे, वैभववाडी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. नामदेव गवळी, नशाबंदी मंडळाच्या जिल्हा समन्वयक अर्पिता मुंबरकर जिल्हा सदस्य प्रा.श्री.एस.एन.पाटील, अँड.प्रताप सुतार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.एम.ए.चौगुले,
डॉ.एस.सी.राडे, प्रा.राहुल भोसले,श्री.एस.पी.परब, डी.के‌.सुतार,राजेंद्र सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
३१ डिसेंबर या वर्षाअखेर दिवशी व्यसन आणि मादक पदार्थाचे सेवन करून नववर्षाचे स्वागत केले जाते. याबाबत तरुण वर्गामध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने नशाबंदी मंडळाच्यावतीने “नववर्ष धुंदीत नव्हे, शुद्धीत साजरे करा” “द दारूचा नव्हे, द दुधाचा” हा संदेश पोचविण्याच्या उद्देशाने व्यसनमुक्ती पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
तसेच महाराष्ट्र राज्याच्या २०११ च्या व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
तहसीलदार श्री.प्रसंन्नजीत चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करुन या विधायक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक श्री.अमित यादव, गटविकास अधिकारी श्री. जयप्रकाश परब, मुख्याधिकारी श्री.सुरज कांबळे, नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
जिल्हा समन्वयक अर्पिता मुंबरकर यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.
यावेळी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी, तसेच दत्त मंदिर तालुका स्कूल येथील बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा उद्देश, पाहुण्यांचे स्वागत,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.एस.एन.पाटील यांनी केले.
नशाबंदी मंडळ जिल्हा समन्वयक अर्पिता मुंबरकर यांनी नशाबंदी मंडळ व या अभियानाची सविस्तर माहिती दिली. शेवटी डॉ.एम.ए.चौगुले यांनी सर्वांचे आभार मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा