You are currently viewing भाजपाच्या जिल्हाध्यक्षांची पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी

भाजपाच्या जिल्हाध्यक्षांची पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी

*संघाची विचारसरणी असलेल्या पक्षाचे मार्गक्रमण कोणत्या दिशेने?*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी कोकणशाही न्यूज चॅनलचे संपादक साईनाथ गावकर यांना फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली होती. सत्य बातमी आली की राजकारण्यांचा माथेशूळ उठतो, आणि मग ते पत्रकारांना धमक्या, शिवीगाळ करतात याचाच प्रत्यय राजन तेली यांनी केलेल्या शिवीगाळ आणि धमकीमुळे सर्वसामान्य लोकांना दिसून आला. जनतेचे सेवक म्हणून राजकारण व समाजकारण करणाऱ्या व्यक्तीने पत्रकार म्हणून समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, सत्य असत्य समाजापुढे निडरपणे मांडणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ करणे केव्हाही निषेधार्ह.

अलीकडे आपल्या पेपरला अथवा न्यूज चॅनेलला जाहिरात मिळविण्यासाठी काही जणांकडून पक्षपाती म्हणा किंवा पेड पत्रकारिता म्हणा, चुकीच्या पद्धतीने अथवा काटछाट करून बातम्या दिल्या जातात, त्यामुळे सर्वच पत्रकारांकडे त्याच दृष्टिकोनातून पाहून काही राजकीय लोकांकडून सरळ मार्गाने पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांकडून तशीच अपेक्षा ठेवली जाते आणि अपेक्षाभंग झाला की पत्रकारांवर जाहिरात न दिल्याने आपल्या किंवा आपल्या माणसाच्या विरोधात बातम्या देता असे आरोप केले जातात, धमक्या दिल्या जातात, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जाते. असाच प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्याकडून घडला आहे. राजन तेली हे हुशार राजकारणी म्हणून ओळखले जातात. करिश्मा करून निवडणुका जिंकण्यात त्यांचा हातखंडा..अशीच त्यांनी महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची निवडणूक देखील जिंकली होती, तेव्हापासून राज्याच्या राजकारणात ते सर्वोपरीचीत झाले. परंतु भाजपाचे जिल्हाध्यक्ष असताना देखील जिल्हा बँक निवडणुकीत त्यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. त्यामुळे राजन तेली यांचे पक्षांतर्गत विरोधक सुद्धा असल्याचे दिसून आले होते.

अलीकडेच राजन तेली यांच्या मुलाचे गोवा येथे लग्न पार पडले व सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर भव्य मंडप उभारून स्वागत समारंभ झाला होता. त्यावेळी स्वागत समारंभासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असे अर्धे अधिक मंत्रिमंडळ सावंतवाडीत उतरले होते. आपल्या कौटुंबिक समारंभात अर्धेअधिक मंत्रीगण सावंतवाडीत आल्याने राजन तेली यांचे बळ वाढले आणि त्यामुळेच ते पत्रकाराला फोन करून *ड मारण्याची भाषा करतात की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, जे घडतं ते दाखविण्याचा आणि समाज सुधारण्याचा त्याचा प्रयत्न असतो. अशावेळी राष्ट्रीय पक्षाची जिल्हास्तरावरील धुरा सांभाळणाऱ्या आणि संघाची विचारसरणी घेऊन चालणाऱ्या भाजपाच्या जिल्हाध्यक्षांकडून एका पत्रकाराला फोन करून धमकी देऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जाते हे मात्र लाजिरवाणे आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी अशा आदरस्थानी असलेल्या नेत्यांनी देशात वाढविलेल्या आणि मोदींच्या नेतृत्वात नावारूपास आलेल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेतील पत्रकारांना शिवीगाळ करतात, *ड मारण्याची, तो*न घेण्याची, चॅनेल बंद करण्याची भाषा करतात म्हणजे लोकशाही असलेल्या देशात भाजपाच्या जिल्हाध्यक्षांकडून ठोकशाही सुरू आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करतोय आणि त्यांचेच लोकप्रतिनिधी मात्र स्थानिक पातळीवर पत्रकारांना शिवीगाळ करून पक्षाला अधोगतीकडे घेऊन जातात की काय? अशी शंका येते आहे. जिथे पत्रकार सुरक्षित नाहीत, त्यांनाच शिवीगाळ होते, धमकी दिली जाते तिथे सर्वसामान्य लोकांना भाजपा कडून काय न्याय दिला जाणार? सर्वसामान्य लोकांनी अशा नेत्यांकडून कोणत्या अपेक्षा ठेवायच्या?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्षे आप्पा गोगटेंसारख्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाची वाटचाल धिमी परंतु शिस्तबद्ध होत होती, एक शिस्तबद्ध पक्ष म्हणूनच आदराने भाजपाकडे लोक पाहत होते. संघाच्या विचारसरणीवर पक्ष वाढत होता, सत्तेत नसला तरी आपली एक वेगळी ओळख भाजपाने जनतेच्या मनात निर्माण केली होती. परंतु बदलत्या राजकारणात पक्षाची धुरा संघाच्या विचारसरणीवर मोठे झालेल्या नेत्यांकडे न राहता पक्षात बाहेरून आलेल्या नेत्यांकडे गेल्याने आणि जिल्ह्याचे नेतृत्व असलेल्या नेत्यांकडून पत्रकारांना धमकी, शिवीगाळ होत असल्याने भाजपाचे मूळ असलेली संघाची विचारसरणी भाजपामध्ये संपली की काय? असा संशय येऊ लागला आहे.

राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या कोकणशाही न्यूज चॅनलच्या साईनाथ गावकर यांना दिलेल्या धमकी व शिवीगाळ प्रकरणाचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मिडिया परिषद, आणि मराठी पत्रकार परिषदेने निषेध केला आहे आणि धमकी देणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्या राजन तेली यांना सडेतोड भाषेत उत्तर देत त्यांच्या दमदाटीला भीक न घालता त्यांनी “सत्य ते दाखविणारच आणि तुम्ही जी शिवीगाळ केली ती क्लिप देखील चॅनल वर दाखविणार ” असे ठणकावून सांगणाऱ्या संपादक साईनाथ गावकर कौतुक करत मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि महाराष्ट्रातील पत्रकार साईनाथ गावकर यांच्या सोबत असल्याचे पत्रक एस.एम.देशमुख यांनी प्रसिद्धीला देखील दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =