वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूकीची प्रक्रिया जाहीर झाली होती. यात पाल ग्रामपंचायत बिनविरोध तसेच वेतोरे गावातील वरचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवड बिनविरोध झाली. दरम्यान, आज २१ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी आणि २२ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी झालेल्या निवडणूकीत सुमारे ७०.५७ मतदान झाले. तालुक्यातील २१ सरपंच पदासाठीच्या ७५ व १६२ सदस्य पदासाठीच्या ३७१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान पेटीत बंद झाले.
यात एकूण ४६ हजार ०२५ मतदारांपैकी ३२ हजार ४८३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
वेंगुर्ला तालुक्यातील ८१ मतदान केंद्रावर सकाळी साडेसात ते अकरा या वेळेत २७ टक्के, साडेअकरा ते दीड यावेळेत ४५ टक्के, दीड ते साडेतीन पर्यंत ५९ टक्के व साडेतीन ते साडेपाचपर्यंत एकूण ७५ टक्के मतदान झाले. आडेली-खुटवळवाडी मतदान केंद्रावर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास यंत्रात बिघाड झाल्याने काहीकाळ मतदानात व्यक्तय आला. आडेली येथे उमेदवार जास्त असल्याने एकाच यंत्रात सर्व उमेदवार मावत नसल्याने दोन यंत्रे देण्यात आली होती. दुस-या मतदान यंत्रात फक्त एकाच उमेदवाराचे नाव होते. त्यामुळे काही मतदारांचा गोंधळ झाला. वेतोरे-वरचीवाडी आणि भोगवे येथेही मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काहीवेळ मतदानात व्यत्यय आला.
सरपंचपदासाठी रेडी ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक दहा उमेदवार निवडणूक रिगणात उभे होते. मतदारांमध्ये वयोवृद्धांचाही समावेश होता. उभादांडा येथील एका मतदान केंद्रावर ९२ वर्षाच्या आजीने आपला मतदानाचा हक्क बजावला. साधारण १२ वाजल्यानंतर मतदानाचा कमी झालेला ओघ दुपारी ३ नंतर पुन्हा वाढला. त्यामुळे ब-याच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. वेंगुर्ला पोलिस निरिक्षक अतुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली २१ही ग्रामपंचायतीतील मतदार केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.