वेंगुर्ले
शहरामध्ये नगर परिषदेमार्फत १५ डिसेंबरपासून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व अॅन्टी रेबिज लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली.
वेंगुर्ले शहरामध्ये भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत आहे. भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करण्याबाबत शहरातील नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा विचार करून वेंगुर्ले नगर
परिषदेमार्फत शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व अॅन्टी रेबिज लसीकरण मोहीम १५ डिसेंबरपासून राबविण्यात येणार आहे.
निर्मिती पिपल्स अॅन्ड ऍनिमल वेलफेअर सोसायटी नागपूर या संस्थेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व अॅन्टी रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. या अंतर्गत शहरातील विविध वार्गांमधून भटके कुत्रे पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपले पाळीव कुत्रे रस्त्यावर न सोडता / आपल्या आवारामध्ये राहतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन कंकाळ यांनी केले आहे.