You are currently viewing 15 डिसेंबर रोजी नरडवे येथे श्री विठ्ठलादेवी मंदिरात जत्रोत्सव

15 डिसेंबर रोजी नरडवे येथे श्री विठ्ठलादेवी मंदिरात जत्रोत्सव

कणकवली:

 

नरडवे येथील श्री विठ्ठलादेवी मंदिरात परंपरेप्रमाणे गुरुवार दि. 15 डिसेंबर रोजी जत्रोत्सव होणार आहे. ग्रामदैवत श्री अंबामातेच्या मंदीरा जवळ असलेल्या श्री विठ्ठलादेवी मंदिरात परंपरागत जत्रोत्सव भक्तिपूर्ण वातावरणात साजरा होतो. आकर्षक रोषणाई, देवींच्या पालख्या, माहेरवासिनीची वर्दळ, दशावतार नाटक, सकाळी काला अशा वातावरणात जत्रोत्सवाची मजा व देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक जत्रोत्सवात सहभागी होतात. श्री विठ्ठलादेवी, श्री कालिकामात आणि श्री पावणादेवी अशा देवींच्या तेजस्वी मूर्ती मंदिरात विराजमान आहेत.

जत्रोत्सवानिमित्त या मूर्ती अलंकृत केल्या जातात. गेले आठवडाभर ग्रामस्थ मंदिर परिसर साफसफाई, सुशोभीकर यात सहभागी होत जत्रेची तयारी करीत आहेत. उत्सवाच्या निमित्ताने माहेरवाशिणी मोठ्या प्रमाणावर गावी येतात. शिवाय चाकरमान्यांची वर्दळही वाढलेली असते. मंदिराभोवती आकर्षक रोषणाई, विविधांगी दुकान आणि भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर गजबजलेला असतो. रात्रौ ग्रामदैवत श्री अंबामातेच्या मंदिरातुन वाजत गाजत देवींच्या पालख्या बाहेर पडतात.

फटाक्यांची आतिषबाजी आणि भाविकांनी पावले धरत घातलेला फेर अशा स्वरूपात पालखी श्री विठ्ठलादेवी मंदिराला प्रदक्षिणा घालते आणि मंदिरात विसावते. रात्रौ वालावलकर दशावतारी मंडळाचे नाटक होते. मंडळातील दिग्ग्ज कलाकारांची अदाकारी पाहण्यासाठी नाट्यरसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात. सकाळी काल्या नंतर जत्रोत्सवाची सांगता होते. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नरडवे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा