पुळासमधील “लांबर” बंधुच्या जिद्दीला सलाम!

पुळासमधील “लांबर” बंधुच्या जिद्दीला सलाम!

प्रतिकुल परिस्थितीवर मात करून गौरेश व राहुलचे दहावीत उत्तुंग यश

कासार्डे / दत्तात्रय मारकड
कुडाळ तालुक्यामधील पुळासगावातील, को.ए.सो.यशवंत परब विद्यालय वसोलीचे विद्यार्थी गौरेश गुंडू लांबर व राहूल विठ्ठल लांबर या दोघा चुलत भावंडांनी दहावीच्या शालांत परीक्षेत घरच्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करून मिळविलेले यश खरोखरच कौतुकास्पद आहे. प्रतिकूल परिस्थितीतही प्रसंगी जंगलात शेळ्या राखण करीत, मोलमजुरी करुन मिळविलेल्या उतुंग यशाबद्दल लांबर बंधुच्या जिद्दीला सलाम करावा लागेल…
कु.गौरेश गुंडू लांबर यांने दहावीच्या परीक्षेत ९१.४०टक्के गुण मिळाले आहेत. घरच्या गरिबीमुळे तो वर्षभर आपल्या वडिलांना शेळ्यांचे राखण करण्याच्या कामात मदत करून मिळविले यश आहे. गौरेश हा मूळातच हुशार व अष्टपैलू विद्यार्थी. चित्रकला रांगोळी, गायन, खेळ, निबंध व वक्तृत्व यासारख्या स्पर्धांमध्येही त्याने यश मिळविले आहे. सुंदर हस्तअक्षर स्पर्धेत विभाग स्तरावर ही यश संपादन केले असून हॉलीबॉल हा त्याचा आवडता खेळ आहे हॉलीबॉल मध्ये सुद्धा त्यांनी जिल्हास्तरावर उज्ज्वल यश संपादन केले आहे. याशिवाय तो शाळेचा आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मानित झाला आहे.
गौरेशचे वडिल गुंडू लांबर शेळीपालन व्यवसाय करतात त्यातून मिळणा-या तुटपुंज्या उत्पनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.त्यांना गौरेश सुट्टीच्या दिवशी आपल्या भावाबरोबर शेळ्या चरण्यासाठी मदत करत असतो. या गुणी गौरेशाचा सायन्स शाखेला प्रवेश घेऊन डाॅक्टर व्हायचंय मानस आहे.
गौरेशचाच चुलत भाऊ राहूल विठ्ठल लांबर यांनेही दहावीच्या परीक्षेत ८८.८० गुण मजुरीची कामे करत करत मिळविले आहेत. राहूललाही गायन व वादनाची आवड.राहूलचे वडिल विठ्ठल लांबर हे मोलमजूरी करून कुंटुबाचा उदरनिर्वाह करतात. राहूल विज्ञान शाखेला प्रवेश घेणार असून त्याचा इंजिनियर बनण्याचा मनोदय आहे.
आजही राहूल व गौरेशने १०वीची परीक्षा झाल्यापासून शेतीचे व गावात मिळेल ती मजूरीची कामे करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत तसेच यातुन होणा-या थोड्याफार बचतीतून ते पुढील शिक्षणाचा खर्च उचलणार आहेत. त्यासाठी ते अहोरात्र परिश्रम करीत आहेत.
पुळास सारख्या ग्रामीण भागातून वसोली हायस्कूल पर्यंत १२कि.मी.चा प्रवास एस.टी.ने करून, कोणत्याही प्रकारचे खाजगी क्लास न लावता, घरची परिस्थिती बेताची व आई-वडिल अशिक्षीत अशा प्रतिकूल परिस्थितीत गौरेश व राहूल भावंडानी जिद्दीने मिळविले यश निश्चितच कौतुकास्पद व उत्तुंग असेच आहे.
ते आपल्या यशाचे श्रेय शाळेतील सर्व शिक्षक व पुळास गावतील विनामोबदला गणित विषयाचे मार्गदर्शन करणारे रविंद्र झोरे यांस देतात.
घरची परिस्थिती गरिबीची असली तरीही पुळासमधील या लांबर बंधूनी गुणांची श्रीमंती मात्र आपल्या मेहनतीने कायम राखली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा