You are currently viewing थांबलेल्या इनोव्हाला बोलेरोची धडक, चौघे विद्यार्थी जखमी

थांबलेल्या इनोव्हाला बोलेरोची धडक, चौघे विद्यार्थी जखमी

झाराप येथे अपघात; दोघे गंभीर जखमी, गोवा-बांबुळीत उपचार सुरू…

कुडाळ

थांबलेल्या इनोव्हा कारला बोलेरो पिकअपची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात चौघे विद्यार्थी जखमी झाले. यातील दोघे गंभीर आहेत. हा अपघात काल रात्री साडेअकरा वाजण्याची सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर झाराप येथे घडला. राहुल बोडे (रा.झाराप), विधान परमार (सावंतवाडी), सागर कदम (गोठोस), आरती नांदोस्कर (कोचरे), अशी या चौघांची नावे आहेत. त्यातील बोडे आणि परवार याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान याप्रकरणी बाॅलेरो चालक लतेश रामचंद्र चुनेकर (रा.दापोली-रत्नागिरी) याच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती हवालदार हनुमंत धोत्रे यांनी दिली.


त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विधान परवार व त्याचे सहकारी हम्पी-कर्नाटक येथे आपल्या ताब्यातील इनोव्हा कारने पर्यटनासाठी गेले होते. तेथून परतत असताना झाराप येथे बोडे याला सोडण्यासाठी ही गाडी महामार्गाच्या बाजूला थांबली होती. यावेळी गाडीच्या मागच्या डिकीतून बॅग काढत असताना त्या ठिकाणी भरधाव वेगाने आलेल्या बोलेरोने त्यांना धडक दिली. यात बोडे आणि परवार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर बाजूला उभे असलेल्या कदम व नांदोस्कर यांना किरकोळ दुखापत झाली. तर अन्य दोघे गाडीत बसल्यामुळे सुखरूप राहिले. अपघात झाल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांनी व प्रवाशांनी तात्काळ धाव घेतली. याबाबतची माहिती पोलिसांना कळविण्यात आली.

यावेळी पोलीस हवालदार अमोल महाडिक, अनंत पालव व हनुमंत धोत्रे या तिघांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी चौघांना कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्या दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलवण्यात आले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा