You are currently viewing कणकवली शहरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या बंद घरात चोरी…

कणकवली शहरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या बंद घरात चोरी…

लाखोंचा मुद्देमाल लंपास; अज्ञात चोरट्याने दोन फ्लॅट फोडले…

कणकवली

शहरात राहणाऱ्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्याच बंद घरात अज्ञाताने चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. बांधकरवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंट मधील दोन बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना काल मध्यरात्री उघडकीस आली. याप्रकरणी निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश लक्ष्मण पथार (६५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घरातून ५ लाख वीस हजार रुपये रोकड व चांदीची दोन हजार रुपयांची समई आदी मुद्देमाल चोरीला गेला आहे. तर दुसऱ्या फ्लॅट मधील मालक हरीश पुरोहीत हे बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्या फ्लॅट मधील चोरीला गेलेल्या मुद्देमालाबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल मध्यरात्री चोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर आज सकाळी श्वानपथकाला पाचारण करून चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र , चोरट्यांचा मागमूस लागू शकला नव्हता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे, हवालदार आर. बी. नानचे यांनी रात्रीच घटनास्थळ गाठले होते. तर सकाळच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, कॉन्स्टेबल सचिन माने यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान पंचनाम्या नंतर अज्ञात चोरट्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मागील काही महिने शांत असलेले चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने कणकवलीवासीयांमध्ये घबराहट पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + nineteen =