सायबर क्राईम, अमली पदार्थ, मद्य प्राशनाचे धोके आदीबाबत जनजागृतीचा प्रयोग..
वेंगुर्ला :
उभादांडा सागरेश्वर बीच येथे असलेल्या पर्यटकांना सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे आज सायबर क्राईम, अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम, मद्य प्राशनाचे धोके आदीबाबत बँड वाजवून आकर्षित करत जनजागृती करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सागरेश्वर किनारी हा जनजागृतीचा आगळावेगळा प्रयोग करण्यात आला.
यावेळी “पोलीस बँड पथका” मार्फत सायबर क्राईम बाबत दक्षता, अमली पदार्थांचे सेवनामुळे शरीरावरील व कुटुंबावर होणारे दुष्परिणाम, मद्य प्राशन करून समुद्रामध्ये गेल्याने कशाप्रकारे घातक ठरू शकते. त्याचे धोके, मद्य प्राशन करून वाहन चालविण्याचे दुष्परिणाम व त्यासंबंधी कायद्याच्या तरतुदी आदींबाबत मार्गदर्शन व चर्चा करून नागरिकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेबाबत सुरक्षित व निरोगी आणि सतर्क राहण्याबाबत मार्गदर्शन केले. पोलिसांच्या या उपक्रमाला पर्यटकांकडून ही चांगला प्रतिसाद मिळाला असून त्यांनी सिंधुदुर्ग पोलिसांची कौतुक केले.