पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि वनविभागाचे अधिकारी यांनी धाव घेत केला पंचनामा*
सावंतवाडी
मगरीच्या हल्ल्यात कारिवडे येथील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हा प्रकार आज सकाळी उघड झाला. लक्ष्मीबाई मेस्त्री (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. काल दुपारी “त्या” आपल्या घराच्या बाजुला असलेल्या ओहोळात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र उशिरापर्यंत घरी परतल्या नाहीत. त्यांचा सर्वत्र शोध सुरू असतानाच आज सकाळी त्याचा मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत ओहोळात आढळून आला. दरम्यान हा मगरीचा हल्ला असल्याचा दावा पोलिस व वनविभागाकडुन करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कारिवडे येथे राहणार्या सौ. लक्ष्मीबाई या घराच्या परिसरात असलेल्या ओहोळावर काल दुपारी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तेथून त्या परत आल्या नाहीत. त्या कुठे तरी कामानिमित्त गेल्या असाव्यात असा संशय आल्याने घरातील व्यक्तींनी शोधाशोध केली. परंतु त्यांचा कुठे ही पत्ता लागला नाही. दरम्यान आज सकाळी त्यांची शोधाशोध सुरू असता बाजूला असलेल्या ओहोळात त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे आणि वनविभागाचे अधिकारी मदन क्षीरसागर यांनी त्या ठिकाणी धाव घेत पंचनामा केला. सौ. लक्ष्मीबाई यांच्या पश्चात एक मुलगा आणी पती असा परिवार आहे. याबाबतची माहिती पोलीस मनोज राऊत यांनी दिली.