You are currently viewing कणकवलीतील बॉक्सेल ब्रिज कोसळण्याचे काम करू देणार नाही!

कणकवलीतील बॉक्सेल ब्रिज कोसळण्याचे काम करू देणार नाही!

अगोदर शहरवासीयांना त्रास होणारी कामे पूर्ण करा

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा महामार्ग च्या अधिकाऱ्यांना इशारा

कणकवली :

कणकवलीतील फ्लाय ओव्हर ब्रिज ला जोडणाऱ्या बॉक्सेल ब्रिज च्या सर्विस रस्त्याच्या लगतच्या भिंती हटवण्याचे काम उद्यापासून सुरू करण्यात येणार असल्याने याबाबत नगरपंचायत कडे सहकार्य मागण्या करता गेलेल्या महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी खडे बोल सुनावले. कणकवली शहरवासीयांची अनेक कामे प्रलंबित असताना केवळ ठेकेदाराच्या सोयी करता बॉक्सेल ब्रिजची ची भिंत हटवून त्या ठिकाणी काँक्रीट प्लेट लावून तुमचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका.

आजही नगरपंचायतीची असलेली जुनी पाईपलाईन अनेकदा फोडून ती पाईपलाईन सर्विस रस्त्याखाली घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय करणाऱ्या लोकांना नगरपंचायत कडून पाणीपुरवठा करणे अडचणीचे होत आहे. ही नव्याने पाईपलाईन घालून देण्याबाबत आश्वासन देऊन देखील ठेकेदार कंपनीने कोणतीही कार्यवाही केली नाही. अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहेत. वारंवार सूचना केल्या तरी त्याची दुरुस्ती केली जात नाही. गटारांची कामे अर्धवट व काही ठिकाणी कोसळलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे जोपर्यंत कणकवली शहरातील जनतेच्या सोयीची कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत बॉक्सेल ब्रिज चे काम सुरू देणार नाही असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला.

कणकवली नगरपंचायत मध्ये आज नगराध्यक्ष दालनात महामार्ग प्राधिकरणचे शाखा अभियंता श्री. साळुंखे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची भेट घेतली. यावेळी चर्चेदरम्यान नगराध्यक्षांनी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरण च्या कामाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आजपर्यंत फक्त ठेकेदार कंपनी व तुम्ही आश्वासन देत आलात. आश्वासने पूर्ण होत नाही तोपर्यंत बॉक्सेल ब्रिज कोसळण्याचे काम सुरू करायचे नाही. कणकवली नगरपंचायत ला कर भरणाऱ्या अनेक महामार्गालगतच्या दुकानदारांना नळ कनेक्शनचे पाणी मिळत नाही. नगरपंचायत ने वारंवार आपल्याला सूचना देऊनही आपण याबाबतची कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे सर्वप्रथम ही पाईपलाईन नव्याने घालून हे काम पूर्ण करा अशी मागणी श्री नलावडे यांनी केली.

यावेळी नगरपंचायत कर्मचारी मनोज धुमाळे यांनी पटवर्धन चौक ते करंबेळकर घरासमोर पर्यंत ठेकेदाराकडून पाईपलाईन घालायचे काम बाकी असल्याचे सांगण्यात आले. त्यावर नगराध्यक्षांनी ही कामे होत नाही तोपर्यंत कणकवली शहरात हायवे चौपदरीकरण ठेकेदार कंपनीला कोणतेही काम करू देणार नाही असा इशारा दिला. नळ योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी जागा नसल्याचे कारण पुढे केले जाते. मात्र सीमांकन हद्द शिल्लक असताना हायवे ठेकेदार कंपनी आपली जबाबदारी झटकून आपण आपली कामे मार्गी लावू पाहत आहे. त्यामुळे अशी दिरंगाई केला तर आम्ही गप्प बसणार नाही. उबाळे मेडिकल समोर जो जुना नाला आहे त्यातील पाणी निचरा होण्याकरता एकच पाईप ठेवण्यात आला. त्यामुळे या ठिकाणचा पाणी निचरा योग्य रीतीने होत नाही. काम सुरू असताना अनेकदा आपल्याला सूचना देऊनही हे काम मार्गी लागले नाही. हायवे प्राधिकरण निव्वळ कामापुरते गोड बोलून कामे उरकण्याच्या मार्गावर आहे. परंतु आता यावेळी तुमच्या आश्वासनांना ऐकून घेणार नाही. अगोदर शहरवासीयांची कामे पुरी करा व नंतरच बॉक्सेल चे पाडकाम सुरुवात करा अशी भूमिका नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी घेतली. कणकवली ऍड. उमेश सावंत यांच्या घराकडील व उबाळे मेडिकल समोरील दोन्ही नाल्यांच्या मूळ उंची पेक्षा कॉंक्रीट व पाईप उंच केल्याने या नाल्यांमधील पाणी निचरा होत नाही. यामुळे तेथील आसपास परिसरात दुर्गंधी पसरते याला जबाबदार कोण? असा सवाल देखील उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केला.

गोकुळधाम कडील नाल्याच्या चुकीच्या कामामुळे गेली तीन वर्ष लोकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरत होते. मात्र नगरपंचायतने स्वतःच्या निधीतून हे काम मार्गी लावले. ही हायवे ठेकेदाराची जबाबदारी होती. आता पुन्हा तुमचं काम आल्यावर नगरपंचायत कडे आलात. मग जनतेची कामे तुमची जबाबदारी असताना ती करणार कोण? याबाबत आमदार नितेश राणे यांच्या जवळ देखील महामार्ग ठेकेदार कंपनी व अधिकाऱ्यांची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत माहिती द्या. प्रलंबित कामे मार्गी लागण्यापूर्वी बॉक्सेल ची भिंत कोसळण्याचे काम काम सुरू केलात तर आम्ही विरोध करणार असा इशारा देखील श्री नलावडे यांनी याप्रसंगी दिला. त्यावर श्री. साळुंखे यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करतो असे यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा