भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; रेंगाळलेले प्रश्न सुटणार, राजन तेली…
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासासाठी महत्त्वाचे ठरणारे सी-वर्ल्ड व एमआयडीसी प्रकल्प मार्गी लागावे, यासाठी पुन्हा एकदा जिल्ह्यात “कॅबिनेट” ची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. ही बैठक झाल्यास मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याबरोबर रेंगाळलेले प्रश्न निश्चितच सुटतील, असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी केला. दरम्यान मागच्या पालकमंत्र्यांच्या काळात नेमके काय झाले हे सांगू शकत नाही. मात्र आताचे पालकमंत्री स्वतः बांधकाम मंत्री असल्याने तसेच केंद्रात व राज्यात आमचीच सत्ता असल्यामुळे जिल्ह्यातले अनेक प्रश्न सुटतील, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. येथील भाजपाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवींद्र मडगावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, एकनाथ नाडकर्णी, महेश धुरी, पंढरीनाथ राऊळ आदींचे मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व भाजप पुरस्कृत म्हणून बिनविरोध निवडून आलेले ग्रामपंचायत सरपंच, सदस्य उपस्थित होते. श्री. तेली पुढे म्हणाले, पूर्वी भाजप शिवसेना युती असताना तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विकास कामे करताना आम्हाला विचारात घेतले नाही. किंवा त्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भाग अविकसित आहे. मात्र आताचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे भाजपाचे असल्याने त्या मला नेहमी विचारात घेत आहेत. विकास कामांबाबत आमच्यासोबत चर्चा करत आहेत. आणि त्यांच्याकडेच बांधकाम मंत्री पदाची जबाबदारी असल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास करणे सुद्धा आता सोपे होईल. भविष्यात ग्रामीण रस्ते दुरुस्त करून कायापालट केला जाईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.