नवी दिल्ली :
देशात कोरोनाने कहर मांडला असून, निसर्ग राजाही कोपला असल्याने पालेभाज्या महागल्या आहेत़ अशातच देशात सण उत्सवाला सुरुवात झाली आहे; मात्र यावर्षी सर्वोच्च सण दिवाळीला कांदा देशवासीयांना रडवणार असल्याचे चित्र दिसून येत असून, कांद्याच्या दरात मोठी भाववाढ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
देशातील विविध भागामध्ये परतीच्या पावसामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे़ शेतक-यांची पीक जमीनदोस्त झाली आहेत़ कांद्यावर देखील याचा परिणाम दिसून आला आहे़ कांद्याच्या किंमती देखील दिवसेंदिवस वाढत असून असेच सुरु राहीले तर, दिवाळीपर्यंत कांद्याच्या किंमती गगनाला भिडतील, असे म्हटले जात आहेत.
देशातील सर्वात मोठी कांद्याची मंडई असलेल्या महाराष्ट्रातील लासलगावमध्ये कांदा ६ हजार ८०२ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मोठा पाऊस पडतो आहे़ यामुळे शेतातील कांदा खराब झाला आहे़ कर्नाटकमध्ये पावसामुळे कांद्यावर परिणाम झाला आहे़ अवेळी आलेल्या पावसामुळे कांद्याची पूर्तता कमी होऊ लागली. याचा परिणाम किंमतींवर झाला आहे़ सोमवारी लासलगावला मंडई उघडली़ तेव्हा कांद्याचे भाव २ हजार प्रति क्विंटलपर्यंत वाढलेले पाहायला मिळाले.
लासलगाव येथील मंडईतील भाव
लासलगावमध्ये सोमवारी कांद्याचा कमाल भाव ६,८०२ प्रति क्विंटल, सरासरी भाव ६२०० रुपये आणि खराब कांद्याचा भाव १५०० रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला.
*मोठ्या व्यापा-यांची कोंडी*
१४ ऑक्टोबरपर्यंत लासलगावच्या मोठ्या व्यापा-यांवर आयकर विभागाची धाड पडली. या भीतीमुळे व्यापारी मंडईत येत नव्हते. पण सोमवारी व्यापारी मंडईत पोहोचले आणि कांद्याचे दर वाढल्याची घोषणा केली.