सिंधुदुर्ग :
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या दरम्यान कोणताही अनूचित प्रकार, घटना न घडता निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी. समाजामध्ये सामाजिक शांतता व परस्पर सामंजस्याची भावना वाढीस लागून सामाजिक एकात्मता अबाधित रहावी, यासाठी दिनांक ६ ते २० डिसेंबर २०२२ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ प्रमाणे नियमन आदेश जारी करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडील पत्रान्यवे सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूका असलेल्या ३२५ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे. तसेच निवडणूक कार्यक्रमानूसार दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार असून दि.२० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे.
दिनांक ०६ डिसेंबर रात्री ००:०१ वाजल्यापासून ते दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी रात्री २४.०० वाजे पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व त्यांच्यावरील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ मधील पोटकलम “अ” ते “फ” प्रमाणे खालील बाबतीत लेखी किंवा तोंडी आदेश देण्याचा अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.
अ) रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणूकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांनी वर्तणुक किंवा वागणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे.
ब) अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गानी व कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहीत करणे.
क) सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या सर्व जागांच्या आसपास उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणे.
ड) सर्व रस्त्यांवर व रस्त्यांमध्ये, घाटांत किंवा घाटांवर, सर्व धक्क्यांवर, व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवळे आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे.
इ) कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्ये वाजविण्याचे किंवा गाणी गाण्याचे, किंवा ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे आणि शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
इ-अ) कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागे जवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांचा (लाऊड स्पीकर) उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
फ) सक्षम प्राधिकान्यांने महाराष्ट्र पोलीस अधिनियमाची कलमे ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यांस पृष्टी देणारे योग्य आदेश देणे.
वरील प्रमाणे अधिकार प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन करील, आदेश पाळणार नाहीत, विरोध करील किंवा त्याचे पालन करण्यास कसुर करेल तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.