You are currently viewing डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*

*डाॅ.बाबासाहेब आंबेडकर*

कभिन्न काळोख,विषारी काटे
अवघड वाटा
जातियतेची कुंपणं इथंतिथं
अमानवी अत्याचारांचा धुमाकूळ
श्वास घेतानाही भयग्रस्त असलेला
एक समाज—दयनीय

अशा अंधारात दूर कुठेतरी
आशावादी काजवा चमकावा तसा
एक प्रकाश जन्माला आलेला
*डाॅ.बाबासाहेब आंबेडकर*

काजवा सूर्य होताना
ख-या सूर्यालाही आनंद होत होता
कारण काही झालं तरी
सूर्य देवू शकत नव्हता
प्रकाश रात्रीचा

एका प्रखर क्रांतीकारी सूर्याने
त्याचे प्रज्ञारुपी उर्जास्रोत
पसरवले अंधारल्या वस्त्यांतून
उध्वस्त केल्या जातीपातींच्या भिंती– सम्यक विचारांनी

आणि लोकशाहीचं वादळ
सर्व काळी क्षितिजं पार करत स्थिरावलं
स्वातंत्र्य समता बंधुतेच्या किना-यावर–ताठ मानेनं

पण वादळालाही असतं वय
येण्याचं,लढण्याचं व जाण्याचंही
दिवसरात्रीच्या घोंघावण्यानं
येत असेल का थकवा
वादळालाही

६ डिसेंबर १९५६
एक जीवघेणा,क्लेशदायक
दिवस–आसवांचा सागर
मानवतेचा जागर मांडणारा
महाप्रवास–थांबलेला
आकाश कोसळलेले
रस्ते हुंदके देत–अस्वस्थ

पण असे वादळ थांबत नसते
त्याचे अंश वंचितांच्या मनामनात
असतात रुजलेले
असा प्रकाश अस्ताला जात नसतो
गल्लीबोळात प्रकाश पुंजके
पेरून ठेवलेले असतात
उद्याच्या प्रकाशासाठी

ह्या उद्याच्या पुंजक्यांना
दाखवायला हवीत
बाबांनी जपून ठेवलेली पुस्तकं
तरच होईल उद्याचा भारत
विश्वगुरू!

<<<>>>
–यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे
बदलापूर
९८९२३३३६८३
दिनांक:-५/१२/२०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा